क्षयरोगमुक्त मुंबई; क्षयरोग रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींची होणार तपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2021 04:09 AM2021-09-05T04:09:38+5:302021-09-05T04:09:38+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : महापालिकेने सुप्त क्षयरोग संसर्गाला प्रतिबंध करण्यासाठी विशेष प्रकल्प हाती घेतला आहे. या प्रकल्पांतर्गत क्षयरोग ...
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : महापालिकेने सुप्त क्षयरोग संसर्गाला प्रतिबंध करण्यासाठी विशेष प्रकल्प हाती घेतला आहे. या प्रकल्पांतर्गत क्षयरोग रुग्णांच्या निकटच्या संपर्कातील व्यक्तींची चाचणी करण्यात येणार आहे. यामुळे क्षयरोग प्रसाराला प्रतिबंध होण्यासह २०२५पर्यंत क्षयरोगमुक्त भारत करण्याच्या भारत सरकारच्या महत्त्वाकांक्षी ध्येयाकडे जाण्यासही मदत होणार आहे. या अनुषंगाने प्रकल्पाची सुरुवात करण्यात आली असून, या प्रकारचा प्रकल्प पहिल्यांदाच राबविला जात आहे.
एफ दक्षिण विभाग कार्यालयात आयोजित कार्यक्रमादरम्यान कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांच्या उपस्थितीत सुप्त क्षयरोग संसर्गाचे मापन व विश्लेषण करणाऱ्या प्रकल्पाची सुरुवात करण्यात आली. यावेळी मंगला गोमारे म्हणाल्या की, सुप्त क्षयरोग संसर्ग मापन प्रकल्पामुळे क्षयरोगाविरोधातील लढ्याला बळ मिळेल. क्षयरोगमुक्त मुंबईच्या दिशेने हे एक महत्त्वाचे पाऊल आहे. हा उपक्रम क्षयरोग संसर्गाला आळा घालण्यासह क्षयरोग निर्मूलनाच्या दृष्टीने महत्त्वाची भूमिका बजावेल.
शेअर इंडिया या संस्थेचे प्रमुख डॉ. विजय येळदंडी यांनी सांगितले की, केईएम रुग्णालयात क्षयरोगविषयक वैद्यकीय चाचणी करण्यासाठी आवश्यक ती प्रयोगशाळा स्थापन करणे, मनुष्यबळ उपलब्ध करुन देणे; इत्यादीसाठी त्यांची संस्था महापालिकेला सहकार्य करेल. सीडीसी इंडिया या संस्थेच्या डॉ. मेलिसा न्येंदक यांनी सांगितले की, क्षयरोग रुग्णांच्या निकटच्या संपर्कातील व घरातील व्यक्तींची सुप्त क्षयरोग संसर्गासाठी तपासणी केली जाणार आहे. या तपासणी दरम्यान बाधा आढळून आल्यास बाधित व्यक्तींवर उपचार करण्यासह आवश्यक तो पाठपुरावा केला जाईल. सक्रिय क्षयरोग असणाऱ्या रुग्णांवर निर्धारित औषधोपचार केले जातील.
----------------
सुप्त क्षयरोग
- सुप्त क्षयरोगाची बाधा झालेल्या व्यक्तींच्या शरिरात क्षयरोगाचे जंतू सुप्तावस्थेत असतात.
- अशी बाधा झालेल्या व्यक्तींमध्ये क्षयरोगाची सामान्यपणे आढळून येणारी लक्षणे नसतात.
- तथापि, सुप्त क्षयरोगाने बाधित असलेल्या व्यक्तीमध्ये भविष्यात सक्रिय क्षयरोग उद्भवण्याची शक्यता असते.
- त्यामुळे सुप्त क्षयरोगाचे उपचार केल्यास संबंधित व्यक्तीला भविष्यात सक्रिय क्षयरोग होण्यापासून प्रतिबंध होऊ शकतो.
----------------
२४ तासांमध्ये अहवाल
सामान्यपणे क्षयरोगविषयक वैद्यकीय चाचण्यांमध्ये सुप्त क्षयरोगाचे निदान होत नाही. त्यामुळे सुप्त क्षयरोगाच्या संसर्गाचे निदान करण्यासाठी आयजीआरए चाचणी करावी लागते. याअंतर्गत संबंधित व्यक्तींच्या रक्ताचे नमुने घेऊन ही चाचणी केली जाते. या चाचणीचा अहवाल सामान्यपणे चाचणी केल्यापासून २४ तासांमध्ये मिळतो.