राज्यात सुमारे आठ कोटी व्यक्तींची क्षयरोग तपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2021 04:06 AM2021-05-28T04:06:26+5:302021-05-28T04:06:26+5:30
मुंबई : कोरोना महामारीमुळे आरोग्य यंत्रणेसमोर आव्हान उभे राहिले आहे. या संकटाचा क्षयरोग कार्यक्रमावर परिणाम झाला असला तर गरजूंना ...
मुंबई : कोरोना महामारीमुळे आरोग्य यंत्रणेसमोर आव्हान उभे राहिले आहे. या संकटाचा क्षयरोग कार्यक्रमावर परिणाम झाला असला तर गरजूंना क्षयरोगासाठी आरोग्यसुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी महाराष्ट्र क्षयरोग कार्यक्रमाने अनेक महत्त्वाच्या उपाययोजना सुरू केल्याची माहिती कुटुंब कल्याण विभागाच्या, आरोग्य सेवा संचालनालयाच्या संचालिका डॉ. अर्चना पाटील यांनी दिली. राज्य क्षयरोग कार्यालयाने आयोजित केलेल्या व्हर्च्युअल मीडिया ब्रीफिंगमध्ये त्या बोलत होत्या.
कोविडपूर्व काळात महाराष्ट्रात दर महिन्याला सरासरी १९ हजार क्षयरुग्णांची नोंद होत होती. ती कमी होऊन एप्रिल २०२१ मध्ये १० हजार ३६ रुग्णांची नोंद झाली. कोविडमुळे क्षयरोगाच्या नोंदींमध्ये घट झाली आहे. भारत सरकारच्या मार्गदर्शक सूचनांच्या आधारे कोरोना, क्षयरोग आणि इन्फ्लुएंजासारखे आजार आणि गंभीर स्वरूपाचे श्वसनाचे संसर्ग झालेल्या व्यक्तींची दोन्ही पद्धतीने चाचण्या करण्यात आल्या. यामध्ये ऑक्टोबर २०२० ते एप्रिल २०२१ या कालावधीत ४ लाख ६७ हजार ३२हून अधिक रुग्णांची क्षयरोग तपासणी करण्यात आली. त्यापैकी ५,२६४ व्यक्तींना क्षयरोग असल्याचे निदान झाले आणि त्यांच्यापैकी ९६ टक्के व्यक्तींवर उपचार सुरू करण्यात आल्याचे पाटील यांनी सांगितले.
महाराष्ट्र सरकारने विविध प्रशासनिक पातळ्यांवर पर्यवेक्षण, रुग्णांना औषधांची घरपोच डिलिव्हरी, क्षयरोग उपचार आणि सक्रीय रुग्ण शोधण्यासाठी खासगी आरोग्य क्षेत्रालाही सहभागी करून घेतले. डिसेंबर २०२०मधील अभियानांतर्गत ८ कोटींहून अधिक व्यक्तींची तपासणी करण्यात आली. ३.३३ लाख संभाव्य क्षयरुग्ण निश्चित केले आणि जानेवारी २०२१ पर्यंत १२ हजार ८२३ क्षयरुग्णांचे निदान केल्याचे पाटील म्हणाल्या.