मुंबईत ५ ठिकाणी होणार क्षयरोग सर्वेक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2021 02:31 AM2021-02-12T02:31:17+5:302021-02-12T02:31:26+5:30

२२ फेब्रुवारीपर्यंत मोहीम सुरू राहणार

Tuberculosis survey to be conducted at 5 places in Mumbai | मुंबईत ५ ठिकाणी होणार क्षयरोग सर्वेक्षण

मुंबईत ५ ठिकाणी होणार क्षयरोग सर्वेक्षण

Next

मुंबई :केंद्र सरकारच्या ‘क्षयरोग मुक्त भारत-२०२५’ या राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन कार्यक्रमांतर्गत मुंबईतील परळ, गोवंडी, घाटकोपर, ग्रँट रोड व प्रभादेवी या पाच ठिकाणी क्षयरोग सर्वेक्षण करण्यात येत आहे. 

या मोहिमेअंतर्गत सार्वजनिक आरोग्य विभागाचे पथक घरोघरी जाऊन दुपारी १ ते सायंकाळी ५ या वेळेत सर्वेक्षण करणार आहे. २२ फेब्रुवारीपर्यंत ही मोहीम सुरू राहणार आहे. त्याचबरोबर कर्मचाऱ्यांचे मनोबल वाढविण्यासाठी उत्कृष्‍ट कामगिरी असलेल्या परिसरांना प्रोत्साहनपर विशेष पारितोषिक दिले जाणार आहे. 

राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन मोहिमेअंतर्गत महाराष्ट्र राज्यातून ११ क्षयरोग परिसरात ही मोहीम राबवली जाणार आहे. त्यात मुंबईतील पाच विभागांचा समावेश करण्यात आला आहे. त्यानुसार या पाच परिसरांत गेल्या पाच वर्षांत राबवण्यात आलेल्या क्षयरोग नियंत्रणविषयक बाबींची विविध निर्देशांकांच्या आधारे पडताळणी करण्यात येणार आहे. 

या पडताळणीसाठी केंद्रीय क्षयरोग विभागाद्वारे ‘नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ एपिडेमॉलॉजी, चेन्नई’ व ‘इंडियन असोसिएशन ऑफ प्रिव्हेंटिव्ह ँँॲण्ड सोशल मेडिसिन’ या मान्यताप्राप्त संस्थांची नेमणूक करण्यात आली आहे. तसेच सर्वेक्षण व पडताळणीसाठी केंद्र सरकारद्वारे स्वतंत्र मोबाइल ॲप तयार करण्यात आले आहे. त्यामध्ये सर्वेक्षणविषयक माहिती महापालिकेच्या पथकांद्वारे नोंदवली जाणार आहे. सर्वेक्षण झाल्यानंतर मुंबईत क्षयरोगाचे नेमके किती प्रमाण हे स्पष्ट  होईल व त्यानंतर क्षयरोगाच्या समुळ उच्चाटनासाठी उपाययोजनांची आखणी होईल. 

मुंबईत २०१५ पासून टीबी नोटिफिकेशनमध्ये झालेली तुलनात्मक घट, खासगी क्षेत्रातील क्षयरोग रुग्णांसाठी विकण्यात आलेली औषधी, जिल्हा तालुका युनिटमध्ये विशिष्ट ॲप्‍लिकेशनद्वारे रुग्ण शोध मोहीम, जिल्ह्यातील विविध निर्देशांकांवर आधारित ‘इंडेक्‍स स्कोअर’ व जिल्ह्यातील विविध रुग्णालये, औषधी विक्रेते यांच्या भेटी घेऊन व त्यांच्यासह ‘फोकस ग्रुप डिस्‍कशन’ करून ही पडताळणी करण्यात येणार आहे. त्यामुळे महापालिकेच्या आरोग्य पथकाला सहकार्य करावे, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे. 

शोध मोहीम राबविण्याकरिता पालिकेची २५ पथके कार्यरत असतील. 
घरातील व्यक्ती कामानिमित्त व इतर कारणांसाठी बाहेर असल्यास, हे पथक दिवसातील इतर वेळीदेखील भेटी देऊन तपासणी करणार आहे.
प्राथमिक तपासणीदरम्यान आढळणारे, क्षयरोगाचे उपचार घेतलेले रुग्ण, क्षयरोगाची लक्षणे आढळलेले संशयित व ज्या घरात एखादा क्षयरोग रुग्ण असल्यास त्या घरातील इतर संशयित रुग्णांची सीबीनॅटद्वारे तपासणी व क्ष-किरण चाचणी केली जाणार आहे. 
क्ष-किरण चाचणी ही निर्धारित खाजगी क्ष-किरण केंद्रामध्ये मोफत केली जाणार आहे. त्यासाठी संशयित रुग्णाला विशेष ‘व्हाऊचर’ देण्यात येणार आहे. टीबी असणाऱ्या रुग्णांना औषधोपचार मोफत दिले जाणार आहेत.

Web Title: Tuberculosis survey to be conducted at 5 places in Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.