लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : फाऊंडेशन फॉर इनोव्हेटिव न्यू डायग्नोस्टिक्स (फाइण्ड) आणि टाटा ट्रस्टतर्फे मुंबई महापालिकेच्या काही रुग्णालयात ‘ट्रनट’ यंत्र बसवण्यात येणार आहे. या यंत्राद्वारे काेरोना व क्षयरोगाच्या चाचण्या करता येतील. ‘ट्रनट’ हे यंत्र गोव्याच्या ‘मोल्बिओ डायग्नोस्टिक्स’ने विकसित केले आहे.
काेरोना आणि क्षयरोग हे श्वसनातील हवा आणि थेंबांद्वारे पसरणारे आजार आहेत. त्यामुळे केंद्रीय आरोग्य व कुटुंबकल्याण मंत्रालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार कोरोनाचे निदान झालेल्या रुग्णांची क्षयरोगासाठी आणि क्षयरोगाचे निदान झालेल्या रुग्णांची काेरोनासाठी तपासणी करण्यात येत आहे.
ही तपासणी ट्रनटद्वारे शक्य होणार आहे. या यंत्रात एक चिप बसवण्यात आली आहे. यात चाचणी केल्यानंतर ६० मिनिटांपेक्षा कमी वेळेत अहवाल प्राप्त होतो. या प्रक्रियेत ‘रिव्हर्स ट्रान्सक्रिप्शन पॉलिमरेज चेन रिअॅक्शन’ चाचणीचा वापर केला जातो. जलद प्रतिजन चाचण्यांमध्ये अबाधित आढळलेल्या रुग्णांची ट्रनटमध्ये चाचणी करण्यात येणार आहे. निवडण्यात आलेल्या प्रत्येक पालिका रुग्णालयात ट्रनट यंत्र, आवश्यक प्रयोगशाळा कर्मचारी, चाचणी साहित्य आदी उपलब्ध करून देण्यात आले आहे.
..................