मुंबईकरांच्या हातावर तूरडाळीची ‘तुरी’!

By admin | Published: July 14, 2016 02:27 AM2016-07-14T02:27:49+5:302016-07-14T02:27:49+5:30

गेल्या वर्षी डाळींनी २०० रुपयांचा टप्पा ओलांडल्यानंतर सरकारने साठेबाजांवर कारवाईचा बडगा उगारला. मात्र आजघडीला मुंबईत तूरडाळ पुन्हा २०० रुपयांपर्यंत पोहोचली आहे.

Tuberculosis 'Turi' on the hands of Mumbaiites! | मुंबईकरांच्या हातावर तूरडाळीची ‘तुरी’!

मुंबईकरांच्या हातावर तूरडाळीची ‘तुरी’!

Next

टीम लोकमत,  मुंबई
गेल्या वर्षी डाळींनी २०० रुपयांचा टप्पा ओलांडल्यानंतर सरकारने साठेबाजांवर कारवाईचा बडगा उगारला. मात्र आजघडीला मुंबईत तूरडाळ पुन्हा २०० रुपयांपर्यंत पोहोचली आहे. केवळ सरकारचे नियंत्रण नसल्याने अवघ्या १२० रुपयांत उपलब्ध होणारी तूरडाळ मुंबईकरांच्या हातावर तुरी देऊन व्यापाऱ्यांमार्फत चढ्या भावाने विकली जात आहे. ‘टीम लोकमत’ने मुंबईतील विविध विभागांतील किरकोळ व्यापारी आणि मॉलमध्ये मिळणाऱ्या तूर डाळीचे दरपत्रक काढले आहे. यामधून सरकारच्या नियंत्रणाअभावी ‘जैसा गाव, तैसा भाव’ असल्याचे स्पष्ट होते.
१ आॅगस्टपासून १२० रुपये प्रति किलो दराने सार्वजनिक वितरण व्यवस्थेमार्फत तूर डाळ उपलब्ध करून दिली जाईल. मात्र ती डाळ कोणत्या प्रकारची असेल, त्यातील अनुदान किती, याबाबत सरकारने स्पष्टता ठेवली नसल्याचा आरोप मुंबई रेशनदुकानदार संघटनेने केला आहे. शिवाय १ आॅगस्टपासून दुकानदारांनी पुकारलेल्या संपामुळे सरकार १२० रुपये प्रति किलो दराने तूरडाळ वितरण करणार तरी कसे? हा एक प्रश्न आहे.
सध्या तरी मुंबईतील उच्चभ्रू परिसरात मध्यम दर्जाच्या तूरडाळीचा भाव १५० रुपयांवर पोहोचला आहे. तर उत्तम दर्जाची तूर डाळ २०० रुपयांपर्यंत पोहोचली आहे. डाळींच्या घावूक विक्रेत्यांना याबाबत विचारणा केली असता मिळालेली माहिती धक्कादायक आहे.
एका घावूक विक्रेत्याने सांगितले की, किरकोळ व्यापाऱ्यांवर सरकारचे नियंत्रण नाही. ८० ते १०० रुपये प्रति किलो दराने तूर गिरण्यांमध्ये येते. तिथे डाळीमध्ये रुपांतर करण्यासाठी प्रति किलो तुरीवर ४ ते ५ रुपयांचा खर्च होतो. त्यानंतर वाहतुकीचा खर्च जोडल्यास सुमारे ११५ ते १२० रुपये प्रति किलो दराने चांगल्या दर्जाची तूरडाळ मुंबईकरांना उपलब्ध झाली पाहिजे. मात्र तूरडाळ इतक्या अधिक भावाने कशी विकली जाते? याची कल्पना नाही. सरकारला या गोष्टीची कल्पना दिलेली आहे. मात्र तरीही अद्याप ठोस उपाययोजना झाल्याचे दिसत नाही.


सामान्य लोकांचे मरण
तुरडाळींच्या वाढत्या भावाचा फटका आम्हाला सहन करावा लागतो. व्यापारी वर्ग मधल्या मध्ये यातील पैसे खातात. आम्हाला चढ्या भावाने या डाळी विकतात. त्यामुळे शासनाने याची योग्य दखल घेत याबाबत एकच भाव ठेवणे गरजेचे आहे.
- स्वाती गावडे,
गृहिणी, मुलुंड

किलोमागे २-३ रुपये मिळतात
एपीएमसीमधून आम्हाला दलाला मार्फत १५२ किंवा १५४ पर्यंत उत्तम दर्जाची तुरडाळ मिळते. त्यात २५ किलोमागे आम्हाला ट्रान्सपोर्टला ४५ रुपये खर्च येतो. किलो मागे आम्हाला फक्त २ ते ३ रुपये निघतात. त्यात आम्ही घाऊक किंमतीत ग्राहकांना विकतो.
- राजेश भानुशाली, विक्रेता, हरिओम होलसेल टे्रडिंग, मुलुंड


‘तुरी’साठी तारेवरची कसरत
तुरीची डाळ दैनंदिन जेवणात वापरावी लागते. त्यामुळे प्रत्येक वेळी किराणा सामान भरताना आर्थिक गणिताची जुळवाजुळव करणे म्हणजे तारेवरची कसरत आहे. बऱ्याचदा विभागातील दुकानदारांकडे तुरडाळीच्या भावात तफावत आढळून येते. या डाळींच्या दरांवर कुठलेच नियंत्रण नसल्याने याचा फटका थेट सामान्यांना बसतो आहे.
- वंदना गोकर्ण, गृहिणी, दादर

दर्जाचे आरोप चुकीचे
घाऊक बाजारपेठेतून ज्या दराला तूरडाळ आम्ही घेतो, त्यातून आम्हाला किरकोळ विक्रेते म्हणून अत्यल्प नफा मिळतो. किरकोळ विक्रेत्यांवर दर्जाबाबत होणारे आरोप चुकीचे आहेत. आमच्याकडील डाळींचा दर्जा उत्तमच असतो.
- सुरेश जैन, अनमोल किराणा स्टोअर्स, दादर


आम्हाला तूरडाळच नको
तुरीची डाळ चाळीस ते पन्नास रुपये किलो होती, तेव्हाही ती महाग वाटायची. डाळ कुकरला लावली आणि सोबत पापड लोणचं असलं तरी एकवेळच निभावून जायचं. पण आता दोनशे रुपये डाळ झाली आहे. डाळ करायची म्हटली आता दुकानात जातानाच धडकी भरते.
- सुहासिनी कदम,
गृहिणी, मालाड

वरण-भातही महागला
सरकार बदलले तरीही महागाईचा भस्मासूर पाठ सोडत नाही. जेवणात नक्की काय करावे? हा रोजचा प्रश्नाचे उत्तर शोधताना नकोसे होते. भाज्या महाग आहेतच. पण, वरणभात खावा म्हटले तरी आता ते शक्य नाही. कारण, तूरडाळीचे भाव आता दिवसेंदिवस वाढत आहेत. आमच्या भागात तूर डाळीत १५ ते २० रुपयांचा फरक दिसून येतो. डाळीच्या किंमती कमी करण्यासाठी सरकार प्रयत्न करणार म्हणतात, पण तसे दिसून येत नाही.
- विनया कारेकर, गृहिणी, ठाकूरद्वार

साठेबाजांवर कारवाई करा !
तूरडाळीचे भाव गगनाला भिडल्याने मासिक खर्चात आणखी वाढ झाली आहे. प्रत्येक किराणा मालात मनमानी कारभार करत ग्राहकांची फसवणूक करत आहेत. तुरडाळीचा साठा करायचा आणि मागणी, पुरवठ्याचे गणित आखत ग्राहकांना लुबाडायचे हे नित्याचे झाले आहे. साठे बाजारांवर कारवाई करणे गरजेचे आहे. तुरडाळीचे भाव नियंत्रणात ठेवणे गरजेचे आहे. अन्यथा सर्व सामान्य मुंबईकर महगाईने असाच त्रस्त होत राहिल.
- काजल पाटील, गृहिणी, कुला

यादीतून तूरडाळ गायब
आम्ही घरोघरी सामान पोहोचवतो. गेल्या काही महिन्यापासून यादीतून तुरडाळीचे नाव कमी होत आहे. पूर्वी पाच ते दहा किलो डाळ घेणाऱ्या गृहिणीं आता एक ते दोन किलोवर समाधान मानतात.
- खिमजीभाई छेडा, अपना स्टोर्स, मालाड

Web Title: Tuberculosis 'Turi' on the hands of Mumbaiites!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.