Join us

तुकाराम मुंढेंची 12 वर्षांच्या सेवेतील 13वी बदली, जाणून घ्या कधीपासून सुरू आहे हा सिलसिला!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2018 7:01 PM

तुकाराम मुंढे अन् बदली आता जणू काही हे समीकरणच झाले आहे.

मुंबई - तुकाराम मुंढे अन् बदली आता जणू काही हे समीकरणच झाले आहे. प्रशासकीय सेवेतील एक धडाकेबाज अधिकारी म्हणून मुंढेंचा उल्लेख केला जातो. कडक, शिस्तप्रिय आणि धोरणी स्वभावामुळेच मुंढे अन् स्थानिक राजकीय नेते असा वाद रंगतो. शासन अन् प्रशासनाच्या या वादातूनच मुंढेंच्या बदलीचा प्रवास सुरू होतो. मुंढें यांची त्यांच्या 12 वर्षांच्या प्रशासकीय सेवेतील ही 13वी बदली आहे. मुंढेंच्या बेधडक काम करण्याच्या शैलीमुळे ते जनतेतही लोकप्रिय आहेत.ते आले, त्यांनी जोमाने काम केले अन् त्यांची बदली करण्यात आली, असे तुकाराम मुंढेंच्या बाबतीत म्हटल्यास वावगं ठरणार नाही. कारण गेल्या 12 वर्षांच्या कार्यकाळात त्यांची 13 वेळेस बदली करण्यात आली आहे. सन 2005 च्या बॅचचे आएएएस असलेल्या मुंढेंनी सोलापूर जिल्ह्यातून आपल्या प्रशासकीय कामाला सर्वप्रथम सुरुवात केली. विशेष म्हणजे सोलापूर येथे प्रोबेशनरी म्हणून ते रुजू झाले होते. त्यानंतर मेळघाटातील धारणी या आदिवासी भागात प्रकल्प अधिकारी म्हणून त्यांची बदली झाली. मग नांदेडचे उपजिल्हाधिकारी म्हणून ते नियुक्त झाले. तर 2008 साली नागपूर जिल्हा परिषदेवर सीईओ म्हणून त्यांनी कार्यभार स्वीकारला. नागपूरवरून 2009मध्ये थेट नाशिकला ‘अतिरिक्त आदिवासी आयुक्त’ पदावर त्यांची बदली करण्यात आली. त्यानंतर मुंबईत केव्हीआयसीच्या सीईओ पदाचा पदभार त्यांनी घेतला. मुंबईनंतर पुन्हा जालना येथे जिल्हाधिकारी म्हणून ते रुजू झाले. त्यानंतर 2011-12 साली त्यांची सोलापूरच्या जिल्हाधिकारीपदी बदली करण्यात आली आहे. त्यामुळे दुसऱ्यांदा सोलापूरकरांना त्यांचा सहवास लाभला. त्यानंतर, 2012 मध्ये मुंबईच्या विक्री व कर विभागाच्या सह आयुक्तपदी त्यांनी पदभार स्वीकारला. तर 2016 मध्ये नवी मुंबई महापालिकेत आयुक्त झाले. तेव्हापासून त्यांची चार वेळा बदली करण्यात आली आहे. नवी मुंबईतून त्यांची बदली केल्यानंतर 29 मार्च 2017 साली त्यांना पुणे पीएमपीएमएलच्या अध्यक्षपदाची सूत्रे देण्यात आली. तेथून त्यांची थेट नाशिकचे आयुक्त म्हणून बदली करण्यात आली. नाशिकहूनही त्यांची बदली थेट नियोजन खात्यात करण्यात आली होती. परंतु आता नियोजन खात्यातूनही त्यांची बदली केली होती. आता त्यांची बदली एड्स नियंत्रण सोसायटीत करण्यात आलेली आहे. मुंढे यांची एड्स नियंत्रण मंडळात प्रकल्प संचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे सोलापूरपासून बदलीचा प्रवास सुरू केलेल्या मुंढेंना सरकार आता तुकाराम मुंढेंना कोठे पाठवणार हे, सध्यातरी गुलदस्त्यातच आहे.

टॅग्स :तुकाराम मुंढे