तुकाराम मुंढे जाणार की राहणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2016 04:18 AM2016-10-25T04:18:57+5:302016-10-25T04:18:57+5:30

रौप्य महोत्सवाकडे वाटचाल करणाऱ्या नवी मुंबई महापालिकेमध्ये आयुक्तांवरील पहिला अविश्वास ठराव मंगळवारी मांडण्यात येणार आहे. तुकाराम मुंढे यांच्याकडून महापौरांसह

Tukaram Mundhe that will stay? | तुकाराम मुंढे जाणार की राहणार?

तुकाराम मुंढे जाणार की राहणार?

Next

- नामदेव मोरे, नवी मुंबई
रौप्य महोत्सवाकडे वाटचाल करणाऱ्या नवी मुंबई महापालिकेमध्ये आयुक्तांवरील पहिला अविश्वास ठराव मंगळवारी मांडण्यात येणार आहे. तुकाराम मुंढे यांच्याकडून महापौरांसह नगरसेवकांना अवमानजनक वागणूक देणे, मनमानी कारभाराचा ठपका आयुक्तांवर ठेवण्यात आला असून सर्वसाधारण सभेत काय निर्णय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मुंढे समर्थक व विरोधक मुख्यालयाबाहेर गर्दी करण्याची शक्यता असल्याने मुख्यालयाबाहेर प्रचंड पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.
नवी मुंबई महानगरपालिकेची स्थापना १९९२ मध्ये झाली. रौप्य महोत्सवी वाटचाल सुरू असलेल्या पालिकेच्या वाटचालीमध्ये २० वे आयुक्त म्हणून तुकाराम मुंढे यांची मे २०१६ मध्ये नियुक्ती झाली. पहिल्या दिवसापासून मुुंढे हे प्रसिद्धीच्या झोतात राहिले. शहरातील अनधिकृत बांधकामांवरील कारवाई, पालिकेतील बेशिस्तपणा मोडीत काढला पण त्यांचा दरारा वाटण्याऐवजी भीती वाटू लागली. नगरसेवक, महापौर, आमदार, खासदार यांच्याशी संवाद न ठेवण्याच्या स्वभावामुळे त्यांच्याविषयी प्रचंड नाराजी निर्माण झाली. गरजेपोटी बांधलेल्या घरांवरील कारवाई, मार्जिनल स्पेस, एपीएमसीमधील कारवाई यामुळे अनेक समाजघटक दुखावले व त्याचा परिणाम म्हणून त्यांच्याविरोधात अविश्वास ठराव मांडण्यात आला आहे. अविश्वास ठरावासाठी विशेष सर्वसाधारण सभेचे आयोजन केल्यापासून शहरातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. महापालिकेमधील भ्रष्टाचाराविषयी वृत्त प्रसिद्ध होवू लागले.
मुंढे २५ नगरसेवकांचे पद रद्द करणार असल्यामुळे त्यांच्याविरोधात अविश्वास ठराव मांडला जात असल्याचे बोलले जावू लागले. महापालिकेची बदनामी सुरू झाल्यामुळे शहरवासीयांमध्ये नाराजी निर्माण झाली. मुंढे यांच्या समर्थनासाठी सोशल मीडियामधून मोहीम सुरू झाली. पालिकेमधील १ लाख कोटी रूपयांचा भ्रष्टाचार मोडीत काढण्यासाठी ठराव मांडला जात असल्याचे वातावरण निर्माण होवू लागले. यामुळे नाराज झालेल्या सर्वपक्षीय नागरिकांनी आयुक्तांच्या विरोधात मोहीम सुरू केली. यामुळे मुंढे समर्थक व विरोधक यांच्यामध्ये सोशल मीडियामध्ये शाब्दिक युद्ध सुरू झाले.
महापौर बंगल्यावर १७ मे रोजी सर्वपक्षीय नगरसेवकांची बैठक झाली व तेव्हापासून आयुक्त हटाव मोहिमेने गती घेतली. स्थायी समिती सदस्यांनी अविश्वास ठरावासाठी विशेष सर्वसाधारण सभेची मागणी केली आहे. अविश्वास ठरावावरून शिवसेनेमध्ये दोन गट निर्माण झाल्याची चर्चा सुरू होती. पण शिवसेनेने सर्व नगरसेवकांना व्हिप जारी केल्यामुळे मतभेद नसल्याचे स्पष्ट झाले आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अंतिम निर्णय माझाच असेल असे घोषित केल्यामुळे सेनेत दुफळी होणार नसल्याचे स्पष्ट झाले. राष्ट्रवादी काँगे्रसचे नेते गणेश नाईक यांनीही शहराच्या हितासाठी मुंढे हटाव मोहिमेस पाठिंबा देवून स्वत: नगरसेवकांशी संवाद साधला होता. काँगे्रस व अपक्ष नगरसेवकांनीही पाठिंबा दिल्याने मुंढे यांच्याविरोधात मोठ्या बहुमताने अविश्वास ठराव मंजूर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

आयुक्त
समर्थकांची भूमिका
तुकाराम मुंढे हे प्रामाणिक अधिकारी आहेत. पालिकेतील भ्रष्टाचार उघडकीस आणल्याने त्यांच्याविरोधात अविश्वास ठराव आणला जात आहे. अतिक्रमण केलेल्या नगरसेवकांचे पद रद्द केले जाणार होते. त्यांनी अतिक्रमण विरोधी धडक मोहीम राबविल्यामुळे त्यांना हटविले जात असून असे अधिकारी शहरासाठी हवे असल्याची भूमिका व्यक्त केली आहे.

हजारो नागरिक करणार शक्तिप्रदर्शन !
मुंढे यांच्याविरोधात मुख्यालयाबाहेर शक्तिप्रदर्शन करण्याचा निर्णय घेतला आहे. किमान दहा हजार नागरिक मुख्यालयाच्या परिसरात एकत्र येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. यासाठी सोशल मीडियामधून जास्तीत जास्त नागरिकांनी एकत्र येण्याचे आवाहन केले जात आहे. मुंढे समर्थकांनी रविवार व सोमवारी रॅलीसह सह्यांची मोहीम राबवून त्यांना पाठिंबा दिला होता. यामुळे मुंढे विरोधकांनीही थेट मुख्यालयाबाहेरच शक्तिप्रदर्शन करण्याचा निर्णय घेतला आहे.

शांतता राखा, अफवांवर विश्वास ठेवू नका
परिमंडळ एकचे उपआयुक्त प्रशांत खैरे यांनी सर्व नवी मुंबईकरांना शांततेचे आवाहन केले आहे. कोणीही कायदा हातात घेवू नये. अफवांवर विश्वास ठेवू नये. महापालिकेचे कर्मचारी, अधिकारी, नगरसेवक व प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी यांनाच मुख्यालयामध्ये प्रवेश दिला जाणार आहे. या व्यतिरिक्त कोणालाही मुख्यालयात प्रवेश दिला जाणार नसून सर्वांनी नियमांचे पालन करावे, असे आवाहन खैरे यांनी केले आहे.

प्रकल्पग्रस्त आक्रमक
मुंढेंविरोधात सर्वाधिक आक्रमक भूमिका प्रकल्पग्रस्तांनी घेतली आहे. मुंढे यांनी गरजेपोटी बांधलेल्या घरांविषयी व्यक्त केलेल्या मतांमुळे प्रकल्पग्रस्तांमध्ये प्रचंड असंतोष आहे. ज्यांनी अतिक्रमण करून झोपडपट्टी वसविली. मोठे बिल्डर व खऱ्या भूमाफियांना अभय देवून प्रकल्पग्रस्तांवरच कारवाईची भूमिका घेतल्याने असंतोष वाढला. यामुळे प्रकल्पग्रस्त मोठ्या संख्येने मुख्यालयावर धडक देण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

जमावबंदी आदेश जारी
सोशल मीडियामधून मुंढे समर्थक व विरोधकांमध्ये शाब्दिक चकमक सुरू आहे. मंगळवारी मुख्यालयामध्ये व मुख्यालयाबाहेर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू नये यासाठी पोलिसांनी जमावबंदी आदेश जारी केला आहे. मुख्यालयाच्या १०० मीटरपर्यंत कोणालाही गर्दी करता येणार नाही. याठिकाणी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार असून या परिसराला पोलीस छावणीचे स्वरूप प्राप्त होणार आहे.

Web Title: Tukaram Mundhe that will stay?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.