कोरोना काळात तुकाराम मुंढेंचं काम चांगलं, गडकरींकडून 'लय भारी' कौतुक
By महेश गलांडे | Published: January 31, 2021 12:32 PM2021-01-31T12:32:18+5:302021-01-31T13:28:49+5:30
२००५ च्या बॅचचे आयएएस अधिकारी असलेल्या तुकाराम मुंढे यांची नागपूरच्या आयुक्तपदावरून काही महिन्यांपूर्वी बदली झाली होती. कोरोनाच्या काळात लॉकडाऊनच्या अंमलबजावणीवरून आयुक्त तुकाराम मुंढे आणि नागपूर महानगरपालिकेतील सर्वपक्षीय नगरसेवकांमध्ये जोरदार राडा झाला होता.
मुंबई/ नागपूर - आपल्या धडाकेबाज निर्णयांसाठी प्रसिद्ध असलेले आणि गेल्या काही महिन्यांपासून कुठलीही जबाबदारी न मिळालेले आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांना शासनाने काही दिवसांपूर्वीच नवीन पोस्टिंग दिली आहे. राज्य सरकारने तुकाराम मुंढे यांच्याकडे राज्य मानवाधिकार आयोगाच्या सचिवपदाची जबाबदारी सोपवली आहे. नागपूर महापालिका आयुक्त पदावरुन मुंढेंची बदली करण्यात आली होती. आता, कोरोना लॉकडाऊन काळात तुकाराम मुंढेंनी चांगलं काम केल्याची पावतीचे नागपूरचे भूमिपुत्र आणि केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी दिली आहे. तुकाराम मुंढेंनी अधिकाऱ्यांना सोबत घेऊन आपल्या कामाची चुणूक नागपुरातही दाखवून दिली होती.
२००५ च्या बॅचचे आयएएस अधिकारी असलेल्या तुकाराम मुंढे यांची नागपूरच्या आयुक्तपदावरून काही महिन्यांपूर्वी बदली झाली होती. कोरोनाच्या काळात लॉकडाऊनच्या अंमलबजावणीवरून आयुक्त तुकाराम मुंढे आणि नागपूर महानगरपालिकेतील सर्वपक्षीय नगरसेवकांमध्ये जोरदार राडा झाला होता. त्यामध्ये भाजपचे विद्यमान महापौर दयाशंकर तिवारी आणि संदीप जोशी आघाडीवर होते. याच वादातून तुकाराम मुंढे यांची नागपूर महापालिकेच्या आयुक्तपदावरून बदलीही झाल्याचे सांगण्यात येते. मात्र, आता भाजपाचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी यांनीच तुकाराम मुंढेंच्या कामाचं कौतुक केलंय. त्यामुळे, अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलंय.
तुकाराम मुंढेंनी कोरोना काळात गरिबांना आणि मजदूरांना राहण्याची उत्तम सोय केली होती, तसेच विविध सामाजिक संस्था आणि संघटनांना एकत्रित घेऊन गरजवंतांना अन्नधान्य पुरविण्यातही ते पुढेच होते. प्रवासी मजूरांची उत्तम सोय त्यांनी केली. तर, क्वारंटाईन सेंटरमध्ये नागरिकांना सर्वसोयी उपलब्ध होतील, याचीही तत्परतेनं काळजी त्यांनी घेतली होती. त्यामुळेच, तुकाराम मुंढेंची बदली झाल्यानंतर नागपूरकरांनी नाराज व्यक्त केली होती. तसेच, नागपूर सोडताना मुंढेंना निरोप देण्यासाठी हजारो नागपूरकर रस्त्यावर उतरल्याचं पाहायला मिळालं.
भाजपा नगरसेवकांची मुंढेंवर टीका
कोरोना उपाययोजनांच्या अंमलबजावणीवरुन आयुक्त तुकाराम मुंढे आणि नगरसेवकांमध्ये सातत्याने खटके उडत असल्यामुळे जून महिन्यात त्यांच्याविरोधात अविश्वास प्रस्ताव दाखल करण्यात आला होता. तत्कालीन महापौर संदीप जोशी यांनी हा प्रस्ताव फेटाळून लावला होता. मात्र, त्यावेळी भाजपच्या नगरसेवकांनी मुंढे यांच्यावर अत्यंत तिखट शब्दांत टीका केली होती. भाजपचे महापालिकेतील सत्तापक्ष नेते दयाशंकर तिवारी हे आवाज चढवून सभेत आयुक्तांसोबत बोलत होते. जर अशाच अविर्भावात भाजपचे नगरसेवक बोलणार असतील, तर मी सभेतून निघून जाईन, असे मुंढे यांनी ठणकावले. त्यावर भाजपचे दयाशंकर तिवारी यांनी ‘सभागृहातूनच काय नागपुरातूनही चालते व्हा’ असे उत्तर त्यांना दिले. तर काँग्रेसचे नगरसेवक हरिश ग्वालवंशी यांनी संत तुकाराम यांच्या नावाला महापालिका आयुक्त मुंढे यांनी त्यांच्या कृतीमुळे कलंक लावू नये, असे विधान केले. नगरसेवकांच्या या अरेरावीमुळे तुकाराम मुंढे प्रचंड व्यथित झाले. त्यामुळे तुकाराम मुंढे रागाच्या भरात सभागृहातून निघून गेले होते.