नालासोपारा (मंगेश कराळे) :- शहरातील पूर्वेकडील परिसरात बुधवारी रात्री ५८ लाख ७४ हजारांचे अंमली पदार्थ बाळगणाऱ्या नायजेरियन आरोपीला अटक करण्यात तुळींजच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलिसांना यश आले आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात अमली पदार्थ पुन्हा नालासोपारा शहरात मिळाल्याने खळबळ माजली असून ड्रग्स माफियांचा नालासोपारा शहरात सुळसुळाट सुरू असल्याचे पुन्हा एकदा निदर्शनास आले आहे. तुळींज पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध एनडीपीएस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केल्याची माहिती पोलीस उपायुक्त सुहास बावचे यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली आहे.
तुळींजचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शलेंद्र नगरकर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक बाळासाहेब बांदल यांना प्रगती नगर येथील जीवदानी हॉलच्या बाजूला अंमली पदार्थ विक्री करण्यासाठी परदेशी नागरिक येणार असल्याची माहिती मिळाली होती. माहितीनुसार, प्रगती नगर येथील जीवदानी हॉलच्या बाजूला गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अधिकारी आणि पोलीस अंमलदारांनी सापळा लावला होता. त्याचवेळी एक नायजेरियन तेथून पळू लागल्यावर पोलिसांनी पाठलाग करून त्याला ताब्यात घेऊन झडती घेतली. आरोपीकडून त्याचे कब्जात १०२.४०० ग्रॅम वजनाचा १० लाख २४ हजार रुपये किंमतीचा एम डी नावाचा अंमली पदार्थ मिळून आला. तसेच त्याच्या घराची झडती घेतल्यावर १७ लाख २२ हजार ५०० रुपये किंमतीचा १७१.२५० ग्रॅम कोकेन आणि ३१ लाख २८ हजार ३०० रुपये किंमतीचे २२३.४५ ग्रॅम एमडी एमए अंमली पदार्थ मिळून आल्याने जप्त केला आहे. ईदे इम्यानूवेल ईदे पॉल (२६) असे आरोपी नायजेरियनचे नाव आहे.
सदरची कामगिरी पोलीस उपायुक्त सुहास बावचे, सहायक पोलीस आयुक्त डॉ. शशिकांत भोसले आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेंद्र नगरकर यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मिथुन म्हात्रे, पोलीस उपनिरीक्षक बाळासाहेब बांदल, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शिवानंद सुतनासे, पोलीस हवालदार अनिल शिंदे, आनंद मोरे, उमेश वरठा, आशपाक जमादार, तडवी, पन्हाळकर, पांडुरंग केंद्रे, छबरीबन, राऊत यांनी केली आहे. आरोपीला गुरुवारी वसई न्यायालयात हजर केल्यावर ७ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पुढील तपासासाठी गुन्हा नार्कोटिक्सला वर्ग करणार आहे. - सुहास बावचे (पोलीस उपायुक्त)