तुळसी तलाव भरुन वाहू लागला
By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2020 05:18 PM2020-07-28T17:18:14+5:302020-07-28T18:58:31+5:30
मुंबईला पाणीपुरवठा करणा-या तलावांपैकी सर्वात लहान तलाव
दररोज १८ दशलक्ष लिटर पाणी पुरवठ्याची क्षमता
मुंबई - मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या सात तलावांपैकी सर्वात लहान असलेला तुळशी तलाव भरून वाहू लागला आहे. या तलावातून दररोज १८ दशलक्ष लिटर पाणी पुरवठा मुंबईत केला जातो. मात्र एक तलाव भरून वाहिला तरी अद्याप सर्व तलाव क्षेत्रात आतापर्यंत केवळ ३३ टक्केच जलसाठा जमा झाला आहे.
मुंबईतच असलेल्या दोन तलावांपैकी एक असलेला तुळशी तलाव भरून वाहू लागला आहे. गेल्या वर्षी १२ जुलै रोजी हा तलाव ओसंडून वाहू लागला होता. पाणीपुरवठा करणा-या तलावांपैकी तुळशी तलाव हा सर्वात लहान असून यातून दररोज सरासरी १८ दशलक्ष लीटर एवढ्या पाण्याचा पुरवठा केला जातो. गेल्या काही दिवसात या तलावाच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या पावसामुळे हा तलाव भरून वाहू लागला आहे.
मात्र आतापर्यंत सर्व तलावांमध्ये एकूण चार लाख ७३ हजार दशलक्ष लिटर जलसाठा जमा झाला आहे. तसेच अद्याप मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा, अप्पर वैतरणा हे मोठे तलाव निम्मेच भरले आहेत. २०१९, २०१८ मध्ये जुलै महिन्याच्या अखेरीपर्यंत तलाव क्षेत्रात एकूण ७५ टक्के जलसाठा जमा झाला होता. परंतु, यंदा तलाव क्षेत्रात पावसाचा जोर कमी असल्याने पाण्याचे टेन्शन वाढले आहे.
असा आहे तुळशी तलाव....
तुळशी या कृत्रिम तलावाचे बांधकाम सन १८७९ मध्ये पूर्ण झाले. या तलावाच्या बांधकामासाठी सुमारे ४० लाख रुपये एवढा खर्च आला होता. या तलावाचे पाणलोट क्षेत्र सुमारे ६.७६ किलो मीटर असून तलाव पूर्ण भरलेला असल्यास पाण्याचे क्षेत्रफळ हे सुमारे १.३५ चौरस किलोमीटर एवढे असते. पूर्ण भरलेला असताना तलावाचा उपयुक्त पाणीसाठा हा ८०४.६ कोटी लीटर एवढा असतो. हा तलाव पूर्ण भरून वाहू लागल्यानंतर अतिरिक्त पाणी हे विहार तलावाला जाऊन मिळते.
मुंबईला दररोज ३८०० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा केला जातो. वर्षभर सुरळीत पाणीपुरवठा होण्यासाठी सातही तलावांमध्ये १ ऑक्टोबर रोजी एकूण १४ लाख ४७ हजार दशलक्ष लिटर जलसाठा असणे अपेक्षित आहे.
(आकडेवारी(दशलक्ष लिटर)
२८ जुलै रोजी
२०२०- ४७३११३
२०१९- १०८९१५५
२०१८- १२०६१९२
जलसाठ्याची आकडेवारी( मीटर्समध्ये )
तलाव कमाल किमान उपायुक्त साठा (दशलक्ष) सध्या
मोडक सागर १६३.१५ १४३. २६ ४९२७३ ....१५२.४०
तानसा १२८.६३ ११८.८७ ३६४७३ ...१२१.९४
विहार ८०.१२ ७३.९२ १७५४४.....७८.१५
तुळशी १३९.१७ १३१.०७ ८०४६ ..१३९.२२
अप्पर वैतरणा ६०३.५१ ५९५.४४ ३९३७५.....५९७.०८
भातसा १४२.०७ १०४.९० २५९१९३ ...१२१.९४
मध्य वैतरणा २८५.०० २२०.०० ६३२१०....२५८.९५