Join us

तुळशी तलाव भरून वाहू लागला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2021 4:06 AM

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : तलावांमध्ये जेमतेम १७ टक्के जलसाठा असल्याने मुंबईत पाण्याचे टेन्शन वाढले आहे. अशावेळी पाणी कपातीचे ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : तलावांमध्ये जेमतेम १७ टक्के जलसाठा असल्याने मुंबईत पाण्याचे टेन्शन वाढले आहे. अशावेळी पाणी कपातीचे संकट ओढावले असताना तुळशी तलाव शुक्रवारी भरून वाहू लागला. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये हा सर्वात लहान तलाव आहे. मात्र यामुळे थोडा दिलासा मिळाला आहे. या तलावातून दररोज १८ दशलक्ष लिटर पाणीपुरवठा केला जातो.

मुंबईला मोडकसागर, तानसा, तुळशी, विहार, मध्य वैतरणा, भातसा, अप्पर वैतरणा या तलावांमधून दररोज ३८०० दशलक्ष पाणीपुरवठा केला जातो. वर्षभर पाणीपुरवठा सुरळीत राहण्यासाठी तलावांमध्ये १ ऑक्टोबर रोजी एकूण १४ लाख ४७ हजार जलसाठा असणे अपेक्षित आहे. मात्र सध्या तलावांमध्ये १७ टक्के जलसाठा आहे. यामुळे लवकरच मुंबईत पाणी कपात लागू होण्याची शक्यता आहे.

तुळशी तलाव शुक्रवारी सकाळी ११ वाजता भरून वाहू लागला. हा तलाव गेल्यावर्षी २७ जुलै रोजी भरला होता. तुळशी तलाव पूर्ण भरल्यावर उपयुक्‍त पाणीसाठा हा ८०४.६ कोटी लिटर एवढा असतो. हा तलाव पूर्ण भरून वाहू लागल्यानंतर याचे पाणी विहार तलावाला जाऊन मिळते.

* महापालिका मुख्यालयापासून साधारणपणे ३५ किलोमीटर अंतरावर हा तलाव आहे.

* या कृत्रिम तलावाचे बांधकाम १८७९ मध्ये पूर्ण झाले. त्यावेळेस तलावाच्या बांधकामासाठी सुमारे ४० लाख रुपये एवढा खर्च आला होता.

* या तलावाचे पाणलोट क्षेत्र हे सुमारे ६.७६ किलोमीटर आहे. तलाव पूर्ण भरलेला असल्यास पाण्याचे क्षेत्रफळ हे सुमारे १.३५ चौरस किलोमीटर एवढे असते.