तुळसी तलाव भरुन वाहू लागला
By जयंत होवाळ | Published: July 20, 2024 01:31 PM2024-07-20T13:31:56+5:302024-07-20T13:33:42+5:30
‘तुळशी तलाव’ भरुन वाहू लागला आहे.
जयंत होवाळ, लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्राला पाणीपुरवठा करणा-या आणि बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रातच असणा-या दोन तलावांपैकी महानगरपालिकेचा ‘तुळशी तलाव’ आज २० जुलै २०२४ रोजी सकाळी ८:३० वाजता पूर्ण भरुन वाहू लागला आहे. गेल्या वर्षी देखील २० जुलै २०२३ रोजीच मध्यरात्री १.२८ वाजताच्या सुमारास हा तलाव भरुन वाहू लागला होता.
८०४.६ कोटी लीटर अर्थात ८०४६ दशलक्ष लीटर उपयुक्त जलधारण क्षमता असणारा हा तलाव वर्ष २०२२ व वर्ष २०२१ मध्ये १६ जुलै रोजीच ओसंडून वाहू लागला होता. तर त्या आधीच्या वर्षी म्हणजेच वर्ष २०२० मध्ये २७ जुलै रोजी तुळशी तलाव ओसंडून वाहू लागला होता. महापालिकेला पाणीपुरवठा करणा-या तलावांपैकी तुळशी तलाव हा सर्वात लहान तलाव असून यातून दररोज सरासरी १८ दशलक्ष लीटर (१.८ कोटी लीटर) एवढ्या पाण्याचा पुरवठा केला जातो. गेल्या काही दिवसात या तलावाच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या पावसामुळे हा तलाव भरून वाहू लागला आहे, अशी माहिती महानगरपालिकेच्या जल अभियंता खात्याद्वारे देण्यात आली आहे.
तुळशी तलावाबाबत महत्त्वाची माहिती संक्षिप्त स्वरुपात पुढीलप्रमाणे आहे
- बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालयापासून साधारणपणे ३५ किलोमीटर (सुमारे २२ मैल) अंतरावर हा तलाव आहे.
- या कृत्रिम तलावाचे बांधकाम सन १८७९ मध्ये पूर्ण झाले.
- या तलावाच्या बांधकामासाठी सुमारे ४० लाख रुपये एवढा खर्च तेव्हा आला होता.
- या तलावाचे पाणलोट क्षेत्र हे सुमारे ६.७६ किलोमीटर असून तलाव पूर्ण भरलेला असल्यास पाण्याचे क्षेत्रफळ हे सुमारे १.३५ चौरस किलोमीटर एवढे असते.
- तलाव पूर्ण भरलेला असताना तलावाचा उपयुक्त पाणीसाठा हा ८०४.६ कोटी लीटर एवढा असतो. (८०४६ दशलक्ष लीटर)
- तुळशी तलाव पूर्ण भरून ओसंडून वाहणारे पाणी हे विहार तलावाला जाऊन मिळते.