मुंबई, दि. 14 - मुंबईला पाणीपुरवठा करणारा तुळशी तलाव भरुन वाहू लागला आहे. हा सर्वात लहान तलाव असला तरी मोठ्या ब्रेकनंतर परतलेल्या पावसाने हा सुखद दिलासा दिला आहे. जुलै महिन्यातच मोडक सागर, तानसा आणि भातसा तलाव भरुन वाहू लागले होते.मुंबईला वर्षभर चांगला पाणी पुरवठा होण्यासाठी तलावांमध्ये १ आॅक्टोबर रोजी १४ लाख ४७ हजार दशलक्ष लीटर जलसाठा असणे अवाश्यक आहे. मुसळधार पावसामुळे सर्व प्रमुख तलावांमध्ये जुलै अखेरीपर्यंत ८५ टक्के जलसाठा जमा झाला होता. तर सर्व प्रमुख तलावं भरुन वाहण्याच्या स्थितीत होती.परंतु आॅगस्ट महिन्यात पावसाने पळ काढला. मुंबईतच नव्हे तर धरण क्षेत्रातही पावसाचा लंपडाव सुरु राहिला. त्यामुळे तलावांमधील पाण्याची पातळी कमी होऊ लागल्याने टेन्शन वाढले होते. मात्र स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येलाच पावसाने खूशखबर आणली आहे. मुंबईस्थित तुळशी तलाव आज सकाळी ६ च्या सुमारास भरुन वाहू लागला आहे.* मुंबईला दररोज ३७५० दशलक्ष लीटर्स पाणीपुरवठा होतो.* मुंबईत पाण्याची मागणी दररोज ४२०० दशलक्ष लीटर्स एवढी आहे.* दररोज २५ ते ३० टक्के म्हणजे सुमारे नऊशे दशलक्ष लीटर्स पाणी गळती व चोरीमध्ये वाया जात आहे.* गेल्या वर्षी तुळशी तलाव १९ जुलै रोजी भरुन वाहिला होता.