लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : पाण्यासाठी गेले काही महिने वणवण करणाऱ्या मुंबईकरांना अखेर दिलासा मिळणार आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये ४३.९२ टक्के जलसाठा जमा झाला आहे. गेल्या वर्षीइतकाच हा जलसाठा असून, तुळशी तलाव भरून वाहू लागला आहे.
१२ जुलै रोजी सकाळपर्यंत तलावांमध्ये एकूण सहा लाख ३५ हजार दशलक्ष लीटर जलसाठा जमा झाला आहे. गेल्या वर्षी याच तारखेला सहा लाख ३६ हजार तर २०१७ मध्ये सात लाख दशलक्ष लीटर जलसाठा जमा झाला होता. मुंबईला दररोज १८ दशलक्ष लीटर पाणीपुरवठा करणारा तुळशी तलाव भरून वाहण्याची शक्यता आहे.
शुक्रवारी २४ तासांमध्ये तलावांत तब्बल ८८ हजार दशलक्ष लीटरने जलसाठा वाढला होता. गेल्या तीन-चार दिवसांत पाण्याची पातळी झपाट्याने वाढत आहे.