अंधेरीच्या श्री स्वामी समर्थ मंदिरात तुलसी विवाह उत्साहात संपन्न

By मनोहर कुंभेजकर | Published: November 30, 2023 05:09 PM2023-11-30T17:09:58+5:302023-11-30T17:11:21+5:30

अंधेरी पश्चिम येथील श्री स्वामी समर्थ मंदिरात तुलसी विवाह पारंपारिक पद्धतीने मोठ्या उत्साहात पार पडला.

Tulsi marriage was solemnized in Andheri's Sri Swami Samarth Temple in mumbai | अंधेरीच्या श्री स्वामी समर्थ मंदिरात तुलसी विवाह उत्साहात संपन्न

अंधेरीच्या श्री स्वामी समर्थ मंदिरात तुलसी विवाह उत्साहात संपन्न

मुंबईदिवाळी संपली की, सर्वांना वेध लागतात ते तुळशीच्या लग्नाचे.. शुभंकर पावलांनी येणारी दिवाळी सुखाचा रेशीम धागा जगण्याला जोडून देते. प्रत्येकाची जगण्यासाठी रोजची धावपळ सुरूच असते. मग त्यात चिंता, व्यथा या तर नेहमीच्याच असतात. दिनक्रमामधील धावपळ, दगदग, ताणतणाव यांनी व्यापलेल्या आयुष्यात हे सण मनाला उभारी देतात. त्यात दिवाळी म्हणजे दिव्यांचा उत्सव मनातील अंधार दूर करून प्रकाशाकडे वाटचाल करा, असा संदेश देणारा आणि मग ती संपली की लगबग सुरू होते ती तुळशीच्या लग्नाची... कार्तिक शुद्ध एकादशीपासून तुलसी विवाह प्रारंभ होऊन कार्तिक पौर्णिमेपर्यंत हा विधी चालतो.

या वर्षी मंगळवार पर्यंत तुळशी विवाह साजरा केला जाईल. तुलसी विवाह महाराष्ट्राच्या बरोबरीने शेजारील गोव्यात देखील मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो.

तुलसी विवाह म्हणजे तुळशीच्या रोपाचे विष्णू किंवा त्यांचा अवतार श्रीकृष्णाशी विवाह प्रबोधिनी एकादशी पासून करण्याची पूजोत्सव प्रथा आहे. भगवान विष्णू कार्तिक महिन्यातील देवउठनी एकादशीला संपूर्ण चार महिने झोपल्यानंतर उठतात, तेव्हा तुळशीशी लग्न लावतात. विष्णूच्या या जागृतीचा जो उत्सव करतात त्याला “प्रबोध” उत्सव असे म्हणतात. भगवान विष्णूला तुळशी खूप प्रिय आहेत, तुळस ही लक्ष्मीचे स्वरूप मानली जाते. तुलसी विवाह हे एक व्रत मानले गेले आहे.हे व्रत केल्याने कर्त्याला कन्यादानाचे फल मिळते. शिवाय तुलशी विवाह केल्याने घरात सुख, शांती आणि समृद्धी नांदते. तसेच धनलाभही होतो. असेही मानले जाते.

अंधेरी पश्चिम येथील श्री स्वामी समर्थ मंदिरात तुलसी विवाह  पारंपारिक पद्धतीने मंगलअष्टकाच्या सुरात, भक्त आणि नागरिकांच्या उपस्थितीत नुकताच मोठ्या उत्साहात पार पडला. महेश नाटेकर यांच्या मार्गदर्शनाखाली मंदिरातील पुजा-यानी धार्मिक विधी पार पाडले.मंदिरावर रंगबेरंगी दिव्यांच्या आकर्षक रोषणाई बरोबर एक भव्य रांगोळी मंदिराच्या प्रांगणात घालण्यात आली होती ती सर्वांचेच लक्ष वेधून घेत होती अशी माहिती येथील स्थानिक नागरिक राजू वेर्णेकर यांनी दिली.

Web Title: Tulsi marriage was solemnized in Andheri's Sri Swami Samarth Temple in mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.