मुंबई : घोटाळेबाज ठेकेदारांना निविदा प्रक्रियेतून हद्दपार केल्यानंतर फेरनिविदा मागविण्याचे पालिकेचे तीन प्रयत्न फेल गेले आहेत़ ठेकेदार मिळत नसल्याने मुंबईतील मोठ्या नाल्यांची सफाई अद्याप सुरू झालेली नाही़ त्यामुळे यंदाच्या पावसाळ्यात पाणी तुंबण्याची दाट शक्यता आहे़ ऐन निवडणुकीच्या तोंडावरच पुराची टांगती तलवार असल्याने अधिकाऱ्यांनाच त्या पाण्यात बुडविण्याचा इशारा शिवसेनेने दिला आहे़नालेसफाईच्या कामामध्ये दीडशे कोटी रुपयांचा घोटाळा गतवर्षी उघड झाल्यानंतर पालिकेने जुन्या ठेकेदारांना काळ्या यादीत टाकले़ त्यामुळे नवीन ठेकेदारांना संधी देण्याचा पर्याय पालिकेपुढे उरला होता़ मात्र मोठ्या नाल्यांसाठी अद्याप ठेकेदार नेमलेले नाहीत़ यामुळे नाल्यांच्या सफाईसाठी अवघे तीन महिने उरले आहेत़ याचे तीव्र पडसाद स्थायी समितीच्या बैठकीत आज उमटले़सभागृह नेत्या तृष्णा विश्वासराव यांनी हरकतीच्या मुद्द्याद्वारे मोठ्या नाल्यांचा गाळ अद्याप काढण्यात येत नसल्याची नाराजी व्यक्त केली़ नाले कचऱ्याने भरले असल्याने स्थानिक रहिवाशांचे आरोग्य धोक्यात आले आहे़ आयुक्तांनी स्थायी समितीच्या सदस्यांबरोबर नाल्यांच्या पाहणीसाठी चलावे, असे आव्हान शिवसेनेचे प्रमोद सावंत यांनी दिले़ पावसाळ्यात मुंबईत पाणी तुंबले तर अधिकाऱ्यांना त्यात बुडवू, असा इशारा शिवसेनेच्या किशोरी पेडणेकर यांनी दिला़
यंदाही पावसाळ्यात मुंबईची तुंबापुरी?
By admin | Published: March 03, 2016 3:00 AM