मुंबई : नवजात अर्भकाचे वजन सर्वसाधारणपणे तीन किलोच्या जवळपास असते. मात्र जे. जे. रुग्णालयात पोटदुखीमुळे दाखल झालेल्या ३३ वर्षीय महिलेच्या पोटातून बुधवारी डॉक्टरांनी चार अर्भकांच्या वजनाएवढी गाठ शस्त्रक्रियेद्वारे काढली. या महिलेची प्रकृती स्थिर आहे. शस्त्रक्रियेआधी या महिलेचे वजन ८० किलो होते, शस्त्रक्रियेनंतर ते ६६.७५० किलोवर आले. १३.२५० किलोची गाठ काढण्याची शस्त्रक्रिया दुर्मीळ असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
वरळी येथे राहणारी आमरिन शेख अनेक महिन्यांपासून पोटदुखी आणि पोटशूळाने त्रस्त होती. सर्वसाधारणपणे प्रसूतीनंतर पोटाचा घेर वाढतो, मात्र काही महिन्यांत आमरिनच्या पोटाचा घेर वाढला आणि वेदना सुरू झाल्या. स्थानिक डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार तिची सोनोग्राफी केली गेली. तिच्या पोटात गाठ असल्याचे आढळले. तिला जे. जे. रुग्णालयात दाखल करण्यात आले.
विविध चाचण्यानंतर डॉक्टरांनी आमरिनच्या पोटात मोठी गाठ असल्याचे निदान केले. डॉक्टरांनी गाठ काढण्याची शस्त्रक्रिया लॅप्रोस्कोपीने करण्याऐवजी प्रचलित पद्धतीने केली. अशा शस्त्रक्रियांमध्ये भूलतज्ज्ञांची भूमिका महत्त्वाची असते. डॉ. भरत शहा यांनी महिलेला भूल दिली.
दोन ते तीन तास ही शस्त्रक्रिया चालली. पोटातील गाठ काढल्यानंतर तिचे वजन करण्यात आले. सव्वा तेरा किलोच्या गाठीचा एक तुकडा अधिक तपासणीकरिता प्रयोग शाळेत पाठविण्यात आला आहे. रुग्णाची प्रकृती स्थिर आहे.
अशा प्रकारच्या दुर्मीळ शस्त्रक्रिया वर्षातून एक दोन वेळा होतात. या शस्त्रक्रिया करण्याकरिता विशेष काळजी घ्यावी लागते. डॉ. राजेश यादव, डॉ. सुप्रिया भोंडवे आणि डॉ. काशिफ अन्सारी या तिघांनी ही शस्त्रक्रिया केली. शस्त्रक्रियेपूर्वी बायोप्सी करण्यात आली. त्यातून कर्करोग नसल्याचे स्पष्ट झाले. मात्र, शस्त्रक्रियेनंतर पुन्हा गाठीचा तुकडा तपासणीसाठी पाठविण्यात आला आहे. - डॉ. अजय भंडारवार, जनरल सर्जरी विभागप्रमुख, सर जे. जे. रुग्णालय
- तीन मुलांची आई असलेली आमरिन म्हणाली, ‘जे.जे.मधील डॉक्टरांनी अनेक महिन्यांच्या आजारपणातून माझी सुटका केली. मला आता बरे वाटत आहे.’