Join us  

१५ दिवसांपूर्वी तुनीषाचं ब्रेकअप; प्रेमातील फसवणुकीने संपवले जीवन? प्रियकर शिजान खानला अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: December 26, 2022 6:01 AM

तुनीषाचे इन्स्टाग्रामवर १० लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत. ती सोशल नेटवर्किंग प्लॅटफॉर्मवर सक्रिय होती.

लोकमत न्यूज नेटवर्क

नालासोपारा/मुंबई : टीव्ही मालिकेतील अभिनेत्री तुनीषा शर्माच्या (वय २४) आत्महत्येप्रकरणी तिचा सहकलाकार व प्रियकर शिजान खान याला वालीव पोलिसांनी अटक केली आहे. प्रेमात फसवणूक झाल्याने नैराश्यातून तुनीषाने स्वत:चे जीवन संपविल्याची तक्रार तिच्या आईने पोलिसांत दिली आहे.  शिजानविरोधात आत्महत्येला प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. त्याला रविवारी वसई न्यायालयात हजर केल्यावर चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. पोलिसांकडे अजूनपर्यंत कोणताही ठोस पुरावा हाती लागलेला नाही. या गुन्ह्याचा तपास सुरु असल्याची माहिती शिजानचे वकील शरद राव यांनी दिली. १५ दिवसांपूर्वी शिजान खानने तिच्यासोबत ब्रेकअप केले

नायगावच्या कामण येथे भजनलाल स्टुडिओत ‘अलीबाबा - दास्तान ए काबूल’ या मालिकेच्या सेटवरील रेस्ट रूममध्ये शनिवारी अभिनेत्री तुनीषा शर्माने आत्महत्या केली. मालिकेतील सहकलाकार शिजान खानवर तुनीषा प्रेम करत होती. १५ दिवसांपूर्वी शिजान खानने तिच्यासोबत ब्रेकअप केले व तिला सोडून दिले होते. याच नैराश्येतून तिने आत्महत्या केल्याची तक्रार तिच्या आईने वालीव पोलिसांत दिली आहे. शनिवारी तुनीषा वॉश रूममध्ये गेली होती आणि बराच वेळ सेटवर आली नाही. त्यामुळे सेटवरील कर्मचाऱ्यांनी रेस्ट रूमचा दरवाजा तोडला तेव्हा ती गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आली. 

तुनीषा शर्माचे शवविच्छेदन

तिच्या पार्थिवाचे जे. जे. रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. यावर जे. जे. रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. संजय सुरासे यांनी सांगितले की, उत्तररात्री १.३० वाजता पोलिसांनी मृतदेह रुग्णालयात आणला. त्याच वेळी शवविच्छेदन प्रक्रियेला सुरुवात करून रविवारी पहाटे ४.३० वाजता शवविच्छेदन पूर्ण करण्यात आले. आता शवविच्छेदन अहवालाची प्रतीक्षा आहे.

इन्स्टाग्रामवर १० लाख फॉलोअर्स

तुनीषाचे इन्स्टाग्रामवर १० लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत. ती सोशल नेटवर्किंग प्लॅटफॉर्मवर सक्रिय होती. मृत्यूच्या अवघ्या सहा तासांपूर्वी तिने इन्स्टाग्रामवर स्वत:चा एक फोटो पोस्ट केला होता.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :गुन्हेगारीनालासोपारावसई विरार