मुंबई- अवघ्या २० वर्षांच्या गुणवान अभिनेत्री तुनिषा शर्मा हिनं आत्महत्या करुन आपलं आयुष्य संपवलं आणि टेलिव्हिजन विश्वात एकच खळबळ उडाली. तुनिषा शर्मा हिनं २४ डिसेंबरला मालिकेच्या सेटवरच आत्महत्या केली. बुधवारी तुनिषाच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. तुनिषा आज या जगात नसली तरी तिच्या आत्महत्या प्रकरणाला दिवसेंदिवस नवं वळण मिळताना दिसत आहे. मात्र याचदरम्यान पोलिसांना एक मोठं यश आलं आहे.
तुनिषाचा मोबाईल पोलिसांनी ताब्यात घेतला होता. परंतु तो मोबाईल अनलॉक असल्याने पोलिसांनी मोबाईलमधील चॅट आणि कॉलचे डिटेल्स मिळत नव्हते. मात्र आता मोबाईल अनलॉक करण्यात पोलिसांना यश मिळाले आहे. तुनिषाच्या फोनचे लॉक उघडण्यासाठी वालीव पोलिसांनी अॅपल कंपनीच्या अधिकाऱ्यांना बोलावले होते. त्यांनी मोबाईल पोलिसांना अनलॉक करुन दिला.
शीजान त्यादिवशी मिस्ट्री गर्लसोबत दीड तास बोलला; पोलिसांच्या हाती लागला मोठा पुरावा!
तुनिषाचा मोबाईल अनलॉक होताच तुनिषाच्या आईचे आणि शीजानच्या आईचे मेसेज आल्याची माहिती समोर येत आहे. तसेच शिजानच्या बहिणींनी देखील तुनिषाला मेसेज केले होते. त्यामुळे शीजानच्या आई आणि बहिणीला पोलीस चौकशीसाठी पोलीस स्थानकात बोलवणार असल्याचं सांगण्यात येत आहे.
तुनिषा शर्माच्या आत्महत्येला जबाबदार असल्याचा आरोप सहकलाकार आणि तिचा एक्स-बॉयफ्रेंड शीजान खान याच्यावर आहे. शीजाननं आपल्या मुलीला फसवलं असा आरोप तुनिषाच्या आईनं केला आहे. शीजानचे आणखी काही मुलींशी संबंध होते आणि याची माहिती तुनिषाला मिळाल्यामुळे दोघांचं ब्रेकअप झालं होतं. याच तणावात तुनिषानं आत्महत्या केल्याचा आरोप करण्यात आला आहे.पोलिसांनी आता शीजानच्या चौकशीत त्याच्या सीक्रेट गर्लफ्रेंडचा शोध लावला आहे.
वालीव पोलिसांनी संबंधित मुलीची ओळख पटवली आहे. पण तिचा जबाब अद्याप नोंदवण्यात आलेला नाही. तसंच शीजानच्या सीक्रेट गर्लफ्रेंडसोबतचे डिलीट केलेले चॅट्स रिकव्हर करण्याचं काम केलं जात आहे. पोलीस तपासादरम्यान तुनिषाने जेव्हा आत्महत्या केली, त्यादिवशी शीजानने सीक्रेट गर्लफ्रेंडसोबत जवळपास एक ते दीड तास बातचीत देखील केली होती. याचा तपास देखील पोलिसांनी आता सुरु केला आहे.
दरम्यान, तुनिषा शर्माचा जन्म ४ जानेवारी २००२ रोजी चंदीगडमध्ये झाला. लहानपणापासूनच तिला अभिनयाची आवड होती. अवघ्या १४व्या वर्षी तिची भारत का वीर पुत्र - महाराणा प्रताप या मालिकेसाठी निवड झाली होती. या मालिकेत तिने राजकुमारी चंद कंवरची भूमिका केली होती. त्याच वर्षी तिने चक्रवर्ती अशोक सम्राट या टीव्ही मालिकेत राजकुमारी अहंकाराची भूमिकाही साकारली होती. त्यानंतर तिने गब्बर पुंचवाला आणि शेर-ए-पंजाब: महाराजा रणजीत सिंग या चित्रपटात भूमिका केल्या.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"