लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मिठी नदीमध्ये जमा होणारे मलजल आता घाटकोपर प्रक्रिया केंद्राऐवजी धारावी मलजल केंद्राकडे वळवण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. यासाठी ६.७ किमी. लांबीचा बोगदा बांधण्यात येणार आहे. मात्र या प्रकल्पाबाबत आणखी अभ्यास करण्याची गरज असल्याचे मत व्यक्त करीत स्थायी समितीने प्रस्ताव रोखला आहे. या प्रकल्पावर पाचशे कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.
मिठी नदीतून प्रवाहित होणाऱ्या मलजलाला प्रतिबंध करण्यासाठी व्यवहार्यता अहवाल व तपशीलवार प्रकल्प तयार करण्याचे काम सल्लागाराला दिले होते. मुंबई मलनिस्सारण प्रकल्प विभागामार्फत नियुक्त सल्लागार मेसर्स आय.व्ही.एल. इंडिया एन्वायरन्मेंट आर अँड डी प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने पाच पर्यायांची हाताळणी केली. त्यानुसार योग्य पर्याय निवडून त्यासाठी मंजुरी घेण्यात आली. या पर्यायानुसार बापट नाला व सफेद पूल नाला येथील मलप्रवाह हा घाटकोपरऐवजी धारावी मलजल प्रक्रिया केंद्रात वळवण्याचा निर्णय घेण्यात आला.
असा असेल बोगदा....
मिठी नदी ते धारावी मलजल प्रक्रिया केंद्रापर्यंतच्या बोगद्याचे काम कांदळवनाच्या खालून केले जाणार आहे. या बोगद्याचे काम जमिनीखाली २५ मीटर खोलवर असेल. तसेच कांदळवनासह सर्व पर्यावरण परवानगी घेण्यात आल्या आहेत. ४९९ कोटी रुपयांच्या या कंत्राट कामांसाठी जे. कुमार आणि मिशिगन या संयुक्त भागीदारीतील कंपनीची निवड झाली आहे.