तूरडाळ सोडून बोला; आणखी महागणार? वरण, आमटी नसल्यास रोजचे जेवण लागते अळणी
By ऑनलाइन लोकमत | Published: June 5, 2023 01:24 PM2023-06-05T13:24:23+5:302023-06-05T13:24:33+5:30
वाढत्या भावामुळे त्याचा फटका बसत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : महाराष्ट्राच्या विविध भागात बहुतांश लोक जेवणामध्ये तूरडाळीचे वरण, आमटीचाच वापर करतात. त्यामुळे इतर डाळींच्या तुलनेत तूरडाळीला मोठी मागणी आहे. दररोज डाळीचे वरण, आमटी नसेल तर जेवण बेचव समजले जाते. तूरडाळ १३० ते १४० रुपये पार गेली आहे. त्यामुळे वाढत्या भावामुळे त्याचा फटका बसत आहे.
राज्यासह परराज्यातील उत्पादक शेतकऱ्यांनी तूरऐवजी अन्य पिकांना प्राधान्य दिले. त्यामुळे मार्चमध्ये येणारी नवीन डाळ बाजारात कमी प्रमाणात आली. पुरवठा कमी असल्याने दरावर परिणाम झाल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. नियमित मार्च महिन्यात तूरडाळीचे नवीन पीक मिलकडे येते, तेथून डाळीत रूपांतर केल्यानंतर ती व्यापाऱ्यांकडे विक्रीसाठी येते. यंदा मात्र, राज्यासह परराज्यांतही उत्पादक शेतकऱ्यांनी तूरऐवजी अन्य पिकांना प्राधान्य दिले आहे.
काही ठिकाणी तूरडाळ १५० रु.वर पोहोचल्याने येत्या काही दिवसांत तूरडाळीची आमटी, वरण विसरावे लागते की काय, असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे.
डाळींच्या दराचा विक्रम
दरवर्षी उन्हाळ्यामध्ये वर्षभराचे अन्नधान्य घेण्याची पद्धत अनेक ठिकाणी पाहावयास मिळते. यंदा मात्र डाळी तसेच अन्नधान्याच्या दरात मोठी वाढ झाली. वर्षभरापूर्वीची तूरडाळ ६ ते १० रुपयांनी महागली. हरभरा, उडीद, मूग, मसूर डाळीच्या किमतीतही मोठी वाढ झाली आहे. वाढीव दरामुळे डाळी आवाक्याबाहेर जात आहेत.
भाव आणखी वाढणार?
तूरडाळीचे पीक कमी झाल्याने बाजारात मिळणाऱ्या तूरडाळीचा भाव वाढला आहे. पुढील काळात सर्वसाधारण १७५, १८०, २०० असा होण्याची शक्यता जाणकार व्यापारी मंडळींकडून व्यक्त होत आहे.
गृहिणींना असाही फटका
इंधन दरात सातत्याने वाढ होत आहे. पेट्रोल, डिझेलचे दर महागल्याने वाहतुकीचा खर्च वाढला. परिणामी तूर, हरभरा, मसूर, उडीद, मूग डाळ तसेच तांदूळ, गहू, विविध प्रकारचे खाद्यतेल यांच्या दरात प्रचंड वाढ झाली. वाढत्या दरामुळे गृहिणींचे आर्थिक बजेट कोलमडले आहे.
हिंग महागला, यंदा लोणचे विकत घेतलेलेच परवडले
उन्हाळ्यात गृहिणींची घरगुती चटकदार लोणचे बनविण्यासाठी लगबग असते. मात्र, गेल्या वर्षीच्या तुलनेत कैरीचे व त्यासाठी लागणाऱ्या मसाल्याचे भाव वाढल्याने चटकदार लोणच्याला महागाईची झळ बसल्याने घरचे लोणचे यंदा काहीसे तिखटच होणार आहे. वाढत्या महागाईच्या काळात मसाल्यांचे दर पुन्हा एकदा चर्चेत आले असून विशेषतः हिंग, जिरे, मसाल्यांचे दर वाढले आहेत.
मसाल्यांच्या किमती ३० टक्क्यांनी वाढल्या
गेल्या दोन वर्षांत मसाल्याच्या किमतीत सुमारे ३० टक्क्यांनी वाढ झाली आहे. तर, बऱ्याच मसाल्यांच्या किमतींनी गेल्या काही वर्षात दुहेरी आकडा गाठला आहे. भारतीय आहारात मसाल्याचे फार महत्त्व आहे. बाजारात विविध कंपन्यांचे पॅकेट बंद मसाले अगदी दहा रुपयांपासून विकले जात असले तरी उन्हाळ्याची चाहूल लागताच वर्षभरासाठी मसाला तयार करून घेतला जातो. मात्र, दुसरीकडे पूर्वापार चालत असलेली ही परंपरा आजतागायत कायम आहे, त्यामुळे मसाल्याच्या वाढलेल्या किमती सामान्य गृहिणींच्या आवाक्याबाहेर आहेत.
हिंग महागला
प्रत्येक स्वयंपाकघरात हिंगाचा वापर केला जातो. पण, अजूनही भारतात हिंगाचे उत्पादन सुरू झालेले नाही. त्यामुळे ते बाहेरच्या देशातून आयात करावे लागत असल्याने तेथून हिंगाची आयात कमी झाल्याने हिंगाचे भाव वाढले आहेत. यामुळे गृहिणी चिंतेत आहेत.
जिरेही महाग
राजस्थान आणि गुजरातहून जिऱ्याची आयात घटल्याने स्थानिक बाजारपेठेत किमतीत मोठी वाढ झाली आहे. गेल्या आठवडाभरात जिऱ्याच्या किमतीत किलोमागे ५० रुपयांची वाढ झाली आहे. यंदाच्या खराब वातावरणामुळे जिऱ्याचे उत्पादन कमी झाले आहे. त्यामुळे साहजिकच आवक घटल्याने दरवाढ झाल्याचे व्यावसायिक सांगत आहेत.
स्वयंपाकघरात लागणाऱ्या जवळपास सर्वच वस्तूंचे दर वाढले असल्याने घरात स्वयंपाक करावा की नाही, असा प्रश्न निर्माण झाला आहे. कोणतीही भाजी घ्यायची तर पावशेरासाठी किमान २० ते २५ रुपये मोजावे लागतात. त्यात आता मसाल्यांचीही भर पडली आहे. तेव्हा रोजचे जेवण तरी कसे बनवायचे हा खरा प्रश्न आहे. - रोहिणी जाधव, गृहिणी.
आम्ही वर्षाचा मसाला तयार करून ठेवत असतो. तरीही हळद, जिरे वगैरे पदार्थ गरजेपुरते घ्यावे लागतातच. दर वाढल्याने यावर्षी मसाला तयार करण्याचा खर्च वाढेल. यामुळे दरवेळेपेक्षा प्रमाण थोडेफार कमी करावे लागेल. काही वेळा तयार मसालाही वापरावा लागेल. - प्रमिला जाधव, गृहिणी.