प्रदूषणाच्या विळख्यात तुर्भे

By admin | Published: January 6, 2016 01:14 AM2016-01-06T01:14:39+5:302016-01-06T01:14:39+5:30

तुर्भे नाक्यावरील संजीवन कॉरीच्या जागेवर सुरू असलेल्या डांबर व काँक्रीट प्रकल्पामुळे या परिसराला प्रदूषणाचा विळखा पडला आहे

Turbhe at the notice of pollution | प्रदूषणाच्या विळख्यात तुर्भे

प्रदूषणाच्या विळख्यात तुर्भे

Next

नामदेव मोरे, नवी मुंबई
तुर्भे नाक्यावरील संजीवन कॉरीच्या जागेवर सुरू असलेल्या डांबर व काँक्रीट प्रकल्पामुळे या परिसराला प्रदूषणाचा विळखा पडला आहे. येथील महापालिकेच्या श्वाननियंत्रण केंद्रातील ३३ पैकी २० वॉर्डबॉयना श्वसनाचे आजार झाले असून, त्यांचा जीव धोक्यात आला आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळाने नोटीस पाठवूनही महापालिका प्रशासनाने अद्याप त्यांच्यावर काहीच कारवाई केलेली नाही.
दगडखाणीच्या जागेवर सुरू असलेल्या डांबर व काँक्रीट प्रकल्पाविषयी वृत्त ‘लोकमत’ने प्रसिद्ध करताच नवी मुंबईमध्ये खळबळ उडाली आहे. ठाणे बेलापूर रोडच्या जवळच महत्त्वाच्या जागेवर हे व्यवसाय सुरू आहेत. जिल्हा अधिकारी कार्यालयाने दगडखाणीसाठी ही जागा जयप्रकाश जगताप यांना मार्च २०१६ पर्यंत दगडखाणीसाठी दिली आहे. परंतु येथील दगडखाण काही वर्षांपूर्वीच बंद झाली आहे. जगताप यांनी ही जागा लिंटेच, जे. कुमार व क्लासिक कंपनीला भाडेतत्त्वावर भागीदारी करार करून वापरण्यासाठी दिली आहे. या ठिकाणी दोन डांबर प्लांट, एक काँक्रीट प्रकल्प, इंटर लॉक व कर्बस्टोन बनविण्याचे कारखाने सुरू केले आहेत. डांबर व सिमेंट प्रकल्पामुळे या परिसरात प्रचंड प्रदूषण होत आहे. धूळ व धुरामुळे हनुमाननगर, फायझर रोड परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. याच ठिकाणी महापालिकेचे श्वान नियंत्रण केंद्र आहे. या केंद्रामध्ये ३३ वॉर्डबॉय काम करीत आहेत. धूळ व धुरामुळे २० जणांना श्वसनाचे आजार झाले आहेत. एक कर्मचाऱ्याला हृदयविकाराचा झटका येऊन गेला आहे. अशीच स्थिती राहिली तर या कर्मचाऱ्यांना क्षण, दमा व इतर गंभीर आजार होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. या कर्मचाऱ्यांनी आरोग्य तपासणी करून त्याचा अहवालही मनपाच्या आरोग्य विभागाकडे पाठविण्यात आला आहे. परंतु यानंतरही संबंधितांवर काहीच कारवाई केली जात नाही. अशीच स्थिती राहिली तर या कर्मचाऱ्यांना स्वत:चा जीव गमवावा लागणार असून, वेळेत प्रदूषण थांबवा नाहीतर येथील केंद्र दुसरीकडे हलवा, अशी मागणी केली जात आहे.
येथील प्रदूषणाविषयी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडेही तक्रार करण्यात आली आहे. आदर्श सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष शिवाजी जाधव यांनीही याविषयी पाठपुरावा सुरू केला आहे. या तक्रारीनंतर प्रदूषण नियंत्रण मंडळाने ६ नोव्हेंबर २०१५ ला जे कुमार इन्फ्रास्ट्रक्चर व लिंटेच इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीला नोटिसी पाठविल्या आहेत. कंपनीने प्रदूषण नियंत्रण प्रणाली बसविलेली नाही. परिसरामध्ये धुळीचे प्रमाण वाढले असून, ते नियंत्रणात आणण्यासाठी काहीच उपाययोजना केलेली नाही. डांबर व काँक्रीट प्रकल्पासाठी आवश्यक खडी, रेती, रसायने उघड्यावर ठेवण्यात येत आहे. या साहित्यावर व परिसरात पाणी मारले जात नाही. यामुळे प्रदूषण नियंत्रण मंडळाने संबंधितांना नोटीस पाठवली आहे. याशिवाय महापालिकेलाही कारवाई करण्याच्या सूचना केल्या आहेत.

Web Title: Turbhe at the notice of pollution

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.