Join us  

वाघोबा खिंडीत दरड कोसळली

By admin | Published: August 08, 2015 9:53 PM

मुंबई-अहमदाबाद महामार्गावर गुरुवारी ढेकाळे गावाच्या हद्दीत वाघोबा खिंडीजवळ दरड कोसळली आहे. मात्र,काँक्रीटच्या बांधामुळे डोंगरावरून पडलेले दगडमाती रस्त्यावर आले नाही.

मनोर : मुंबई-अहमदाबाद महामार्गावर गुरुवारी ढेकाळे गावाच्या हद्दीत वाघोबा खिंडीजवळ दरड कोसळली आहे. मात्र,काँक्रीटच्या बांधामुळे डोंगरावरून पडलेले दगडमाती रस्त्यावर आले नाही. मात्र, पुन्हा वादळी पावसामुळे पूर्ण डोंगर कोसळून मुंबई-अहमदाबाद महामार्ग बंद होण्याची शक्यता आहे. आयआरबी कंपनीच्या ठेकेदारांनी रस्ता रुंदीकरणासाठी डोंगर पोखरले आहेत. मात्र, यावर वन विभाग काही बोलायला तयार नाही.मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गाचे सहापदरीकरण सुरू असताना वाघोबा खिंड, भालिवली येथे उंच डोंगर रस्त्याच्या रुंदीकरणासाठी पोखरण्यात आले होते. परंतु, सततच्या पावसामुळे वाघोबा खिंडीजवळ मुंबई वाहिनीलगत असलेली दरड (डोंगराचा काही भाग) कोसळलेली आहे. मात्र, रस्त्याच्या बाजूला बांधलेल्या संरक्षण भिंतीमुळे दगड, माती, मुरूम, झाडे रस्त्यावर आले नाहीत. मात्र, भालिवली येथे गुजरात वाहिनीवर डोंगर पोखरलेला असून तोही कोसळण्याच्या मार्गावर आहे. तो कोसळला तर दरड रस्त्यावरच पडेल.मुंबई-अहमदाबाद महामार्गाचे सहापदरीकरण करण्यासाठी वन विभागाची शेकडो एकर जमीन आयआरबीने ताब्यात घेतली आहे. वनजमिनीवरील शेकडो झाडेझुडुपे पाडण्याचे व डोंगर पोखरण्याचे काम केले जाते. वन विभागाने रस्ता रुंदीकरणासाठी ३० फुटांची परवानगी दिल्याची माहिती मिळते. मात्र, आयआरबीकडून त्यापेक्षा कितीतरी जास्त जमीन ताब्यात घेतली जात आहे. पालघर वन विभागाचे सब डीएफओ. कुपते यांच्या बोलण्यावरून असे समजते की, आजपर्यंत रस्त्याच्या सहापदरीकरणासाठी वन विभागाची कोणतीही परवानगी न घेता शेकडो एकर जमीन मुंबई-अहमदाबाद महामार्गासाठी वापरण्यात आली आहे. याबाबत आयआरबी मौन पाळून आहे. (वार्ताहर)वनजमीन रस्त्यासाठी हॅण्डओव्हर केलेली आहे. परवानगी दिली की नाही, हे बघावे लागेल. - कुपते,सब डीएफओ, पालघर वन विभाग