आठ दिवसांपासून चिंचोली बंदर येथे गढूळ पाण्याचा पुरवठा
By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2019 01:53 AM2019-07-18T01:53:52+5:302019-07-18T01:53:59+5:30
गेल्या आठवड्याभरापासून मालाडच्या चिंचोली बंदर परिसरात गढूळ पाण्याचा पुरवठा होत आहे.
मुंबई : गेल्या आठवड्याभरापासून मालाडच्या चिंचोली बंदर परिसरात गढूळ पाण्याचा पुरवठा होत आहे. या पाण्याला गटारातील पाण्याची दुर्गंधी येत असून, ते प्यायल्याने पोटाच्या एखाद्या विकाराला बळी पडण्याची भीती स्थानिकांना वाटत आहे़ त्याबाबत पालिकेच्या पी दक्षिण विभागाने योग्य ती उपाययोजना लवकरात लवकर करावी अशी मागणी स्थानिकांकडून करण्यात येत आहे.
चिंचोली बंदरच्या मधुर सोसायटीत मोठ्या प्रमाणात गढूळ आणि दुर्गंधी येणाऱ्या पाण्याचा पुरवठा केला जात असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. गेल्या आठ दिवसांपासून हा प्रकार सुरू असून, अद्याप याबाबत काहीच उपाययोजना न करण्यात आल्याने संताप व्यक्त केला जात आहे. ‘आम्ही पिण्याचे पाणी एक ते दीड तास रोज उकळतो. मात्र, अखेर गढूळ आणि अत्यंत उग्र वास वास असलेले पाणी पिण्याची वेळ आमच्यावर आली आहे,’ असे एका स्थानिकाने सांगितले, तर गेला आठवडाभर हा प्रकार सुरू आहे. काही दिवसांपूर्वी पालिकेच्या आरोग्य विभागाचे पथक या ठिकाणी विविध आजारांची माहिती, तसेच त्याबाबत घ्यायच्या काळजीची माहिती देणारे पत्रक चिकटवून गेले. मात्र, दूषित पाण्याबाबत अद्याप काहीच उपाययोजना करण्यात आलेली नाही,’ असेही त्यांनी सांगितले. ‘पिण्याच्या पाण्याला गटारासारखा वास येत असल्याने, आम्ही सध्या बाहेरून पाण्याच्या बाटल्या विकत घेत आहोत,’ असेही एका स्थानिकाने सांगितले. त्यामुळे पी दक्षिणच्या संबंधित विभागाने याबाबत लवकरात लवकर उपाययोजना करावी, अशी मागणी स्थानिकांकडून केली जात आहे.