मुंबई - केंद्र सरकारचं पावसाळी अधिवेशन सुरू असून अविश्वास प्रस्तावावर सध्या ससंदेच चर्चा सुरू आहे. या प्रश्नावरुन मोदी सरकारला घेरण्याचा प्रयत्न विरोधक करत आहेत. तर, मणीपूरच्या घटनेवर, महागाईवर आणि देशातील एकूणच विरोधकांच्या प्रश्नावर पंतप्रधान नरेंद्र मोदी गप्प आहेत. मोदी या प्रश्नांवर बोलत नाहीत, असे म्हणत विरोधकांकडून मोदींवर टीका केली जात आहे. आता, शिवसेनेनंही पंतप्रधानांची उल्लेख मौनीबाबा असा करत देशातील तुरडाळ अन् साखरेच्या उत्पन्नाकडे लक्ष वेधले आहे. तसेच, महागाईमुळे जनता त्रस्त झाल्याचंही शिवसेनेनं म्हटलं आहे.
अन्नधान्य, कडधान्य, भाजीपाला, फळे आणि साखरेसह इतर पिकांचे उत्पादन निसर्गावर अवलंबून आहे, हे खरेचआहे. तथापि, त्याच्या उत्पादनातील तुटीची झळ देशाच्या अर्थव्यवस्थेला आणि सामान्य जनतेला कमीत-कमी कशी बसेल याचा मार्ग केंद्रातील सरकारने काढायचा असतो. मात्र नेमके येथेच घोडे पेंड खाते आहे. एकीकडे देशाची अर्थव्यवस्था जगात तिसऱ्या क्रमांकावर आल्याचे सांगत स्वतःची पाठ स्वतःच थोपटून घ्यायची आणि भयंकर महागाईवर नेहमीप्रमाणे 'मौनीबाबा' बनून राहायचे, असे म्हणत शिवसेनेच्या मुखपत्रातून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करण्यात आलीय. तसेच, आधीच महागाईचा भार त्यात साखर, धान्य आणि डाळींच्या टंचाईची मार अशा कोंडीत देशातील जनता सापडण्याची भीती आहे. अर्थात केंद्रातील सत्तापक्षाला त्याची फिकीर कुठे आहे?, असेही शिवसेनेनं म्हटलं आहे.
राजकारणात मग्न, महागाईकडे दुर्लक्ष
देशात सध्या सर्वच प्रकारच्या महागाईने टोक गाठले आहे. त्यात धान्य, डाळी आणि साखरेच्या टंचाईच्या भीतीची भर पडली आहे. अर्थात, या परिस्थितीची केंद्रातील मोदी सरकारला कितपत जाणीव आहे, हा प्रश्नच आहे. हे सरकार फक्त विरोधी पक्षांच्या फोडाफोडीत, केंद्रीय तपास यंत्रणांचा दहशतवाद माजविण्यात आणि निवडणुकीच्या राजकारणातच मग्न आहे. म्हणूनच काही महिन्यांपासून महागाईचा आलेख चढता असूनही सरकार ढिम्मच आहे. टोमॅटोचे भाव प्रति किलो दीडशे-दोनशे रुपयांच्या खाली यायला तयार नाहीत. नवीन टोमॅटोचे पीक बाजारात येईपर्यंत या स्थितीत बदल होऊ शकत नाही, असे सांगत आपली जबाबदारी झटकून सरकार मोकळे झाल्याचे शिवसेनेनं म्हटलं आहे.
डाळी अन् साखरेचं उत्पन्न घटणार, दर वाढणार
यंदा डाळींच्या पेरणीत तब्बल नऊ टक्के तूट आहे. त्यातही तूरडाळीच्या आधीच्या पाच लाख टन तुटीमध्ये यंदा आणखी चार लाख टनाची भर पडण्याची शक्यता आहे. असे झाले तर तूरडाळीची टंचाई निर्माण होईल आणि तिचे दरही सामान्यांच्या आवाक्याबाहेर जातील. तीन-चार वर्षांपूर्वी तूरडाळीच्या दरवाढीने सर्वसामान्यांच्या डोळय़ांतून पाणी आणलेच होते. या वर्षीही तसेच होण्याची भीती आहे. केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या राष्ट्रीय खाद्य मिशननुसार गेल्या वर्षी देशात 117.87 लाख हेक्टरवर तूरडाळींच्या बियाण्यांची पेरणी झाली होती. यंदा हा आकडा 106.88 लाख हेक्टर इतका घसरला आहे. इतर डाळी आणि कडधान्यांबाबतही यापेक्षा वेगळे चित्र नाही. सगळय़ांचे तोंड गोड करणारी साखरदेखील या वर्षी 'कडू' होण्याची चिन्हे आहेत. देशातील साखर उत्पादनही सलग दुसऱ्या वर्षी घटण्याची शक्यता आहे. यंदा साखर उत्पादन 31.7 दशलक्ष टनांवरच थांबण्याची शक्यता आहे. त्यामुळे डाळी आणि कडधान्यांबरोबरच साखरेचीही देशात टंचाई भासेल, असे चित्र आहे.