Join us

टर्कीच्या तिकिटाचे पैसे, रिक्षात हातचलाखीने लंपास! शेअर ट्रेडरची पोलिसांत धाव

By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2023 9:13 AM

टर्कीला जाण्यासाठी विमानाचे तिकीट बुक करायला निघालेल्या शेअर ट्रेडरचे पैसे हातचलाखीने रिक्षातून लंपास केले.

मुंबई :

टर्कीला जाण्यासाठी विमानाचे तिकीट बुक करायला निघालेल्या शेअर ट्रेडरचे पैसे हातचलाखीने रिक्षातून लंपास केले. याप्रकरणी त्यांनी चौघांविरोधात तक्रार दिल्यावर निर्मलनगर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे, ज्यात रिक्षाचालकाचाही समावेश आहे. 

तक्रारदार अजय मोहन (वय ६९) हे अंधेरी पश्चिमेतील चार बंगला परिसरात राहतात. शेअर ट्रेडिंगचा व्यवसाय करणारे मोहन त्यांची पत्नी अनिता हिच्यासोबत २० एप्रिल रोजी टर्कीला जाणार होते. त्यासाठी त्यांना विमानाचे तिकीटही बुक करायचे असल्याने त्यांनी बॅगेमध्ये १ लाख ६० हजार रूपये ठेवले होते. त्यानुसार १० एप्रिल रोजी दुपारी चारच्या सुमारास त्यांचा एक मित्र रवी थेवर याला भेटायला ते खेरवाडी परिसरात आले आणि त्याच्याच परिचयाने ते तिकीट बुक करणार होते. मात्र, बुकिंग न झाल्याने त्यांनी चेतना कॉलेज समोरून साडेसहाच्या सुमारास वांद्रे रेल्वे स्थानकावर जाण्यासाठी शेअर रिक्षा पकडली ज्यात आधीच तिघे होते. 

गुन्हा दाखलरिक्षाचालकाने स्टेशनला जाण्यास तयारी दर्शविल्यानंतर मागच्या सीटवरचा एक प्रवासी हा चालकाच्या बाजूला जाऊन बसला आणि कलानगर जंक्शन येथे चालकाने पुन्हा त्याला मागच्या प्रवाशाच्या मांडीवर जाऊन बसायला सांगितले. त्यावेळी त्याने मोहन यांची बॅग अडचण होत असल्याचे सांगत मागच्या बाजूला ठेवली आणि स्टेशन आल्यावर शेअरिंगचे पैसे देत मोहन तिथून निघून गेले. त्यानंतर त्यांनी बॅग तपासली तेव्हा त्यातील पैसे हे आत नसल्याचे त्यांना समजले. अखेर रिक्षातील चौघांनी संगनमताने चोरी केल्याचे त्यांच्या लक्षात आले आणि त्यांनी याप्रकरणी निर्मलनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. हे सर्व आरोपी ३५ ते ४५ वयोगटातील आहेत.

टॅग्स :ऑटो रिक्षा