Join us

पर्ससीन पद्धतीने मासेमारी परवाने बंद

By admin | Published: February 06, 2016 3:52 AM

सागरी किनारपट्टी क्षेत्रात पर्ससीन पद्धतीने मासेमारी करण्यासाठीचे परवाने देण्यात येऊ नयेत असे आदेश शासनाने आज काढले.

मुंबई : सागरी किनारपट्टी क्षेत्रात पर्ससीन पद्धतीने मासेमारी करण्यासाठीचे परवाने देण्यात येऊ नयेत असे आदेश शासनाने आज काढले. या निर्णयामुळे पारंपरिक पद्धतीने मासेमारी करणाऱ्या २ लाख मच्छीमारांना दिलासा मिळाला असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.तारली, बांगडा व अन्य महत्त्वाच्या माशांच्या जातींची पिल्ले प्रजोत्पादनाची किमान अवस्था येण्यापूर्वी पकडली गेल्याने मत्स्योत्पादनावर त्याचा प्रतिकूल परिणाम होतो. प्रजोत्पादन हंगामात उथळ पाण्यात पर्ससीन जाळ्यांच्या मदतीने केल्या जाणाऱ्या मासेमारीमुळे समुद्राच्या तळातील जीवसृष्टीची हानी होण्यासह समुद्रीय पर्यावरणावरील प्रतिकूल परिणामामुळे मत्स्योत्पादनावर दुष्परिणाम होतात. त्यामुळे मत्स्योत्पादन वाढण्याबरोबरच पारंपरिक मासेमारांना दिलासा देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.अत्याधुनिक नौकांचा वापर समुद्रातील खोल पाण्यात पर्ससीन पद्धतीने मासेमारी करण्यात येते. मात्र, समुद्रकिनाऱ्याजवळील कमी पाण्यामध्येही पर्ससीन पद्धतीने मासेमारी होऊ लागल्याने त्याचा पारंपरिक पद्धतीने मासेमारी करण्यावर प्रतिकूल परिणाम होत होता. त्याचा अभ्यास करण्यासाठी डॉ. व्ही.एस. सोमवंशी यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली होती. तिच्या शिफारशीनुसार मत्स्यसाठ्यांचे जतन करण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले होते.