एलईडी लाईटद्वारे पर्ससीन नेटने मासेमारी बंद करा, ससून डॉक येथे मश्चिमारांचे हल्लाबोल आंदोलन
By ऑनलाइन लोकमत | Published: February 9, 2018 07:47 PM2018-02-09T19:47:57+5:302018-02-09T20:19:57+5:30
जोपर्यंत एलईडी लाईटद्वारे पर्सेसेन नेटने मासेमारी बंद होत नाही तोपर्यंत हे हल्लाबोल आंदोलन सुरूच राहील.या वेळी काही अघटित घडल्यास त्यास शासन व मत्यस्यव्यवसाय विभाग जबाबदार असेल...
मुंबई : मत्स्यव्यवसाय खात्याच्या हलगर्जीपणाचा निषेध करण्यासाठी आज सुमारे 4 तास न्यू जेट्टी,ससून डॉक,कुलाबा बंदरावर नॅशनल फिश वर्कस फोरम व महाराष्ट्र मश्चिमार कृती समितीतर्फे जोरदार हल्लाबोल आंदोलन करण्यात आले. जोपर्यंत एलईडी लाईटद्वारे पर्सेसेन नेटने मासेमारी बंद होत नाही तोपर्यंत हे हल्लाबोल आंदोलन सुरूच राहील.या वेळी काही अघटित घडल्यास त्यास शासन व मत्यस्यव्यवसाय विभाग जबाबदार असेल असा ठोस इशारा महाराष्ट्र मश्चिमार कृती समितीचे अध्यक्ष लिओ कॉलासो व सरचिटणीस किरण कोळी यांनी दिला आहे.
यावेळी मंचकावर कॅबिनेट दर्जा मिळालेले भाजपाचे विधानसभेचे मुख्य प्रतोद,कुलाबा विधानसभेचे आमदार राज पुरोहित,दापोलीचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार संजयराव कदम,भांडूपचे शिवसेनेचे आमदार अशोक पाटील,विधानपरिषदचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार राहुल नार्वेकर,माजी आमदार अशोक धात्रक,नॅशनल फिश वर्कस फोरमचे अध्यक्ष नरेंद्र पाटील,लिओ कोलासो,किरण कोळी,महाराष्ट्र मश्चिमार कृती समितीचे कार्यध्यक्ष रामकृष्ण तांडेल,चिटणीस मोरेश्वर वैती व उल्हास वाटकरे,मोरेश्वर पाटील,खजिनदार रमेश मेहेर,महिला संघटक पूर्णिमा मेहेर,हर्णे बंदर संघर्ष समितीचे अध्यक्ष पांडुरंग चौगुले,कुलाबा मश्चिमार सर्वोदय सहकारी सोसायटीचे अध्यक्ष जयेश भोईर,ससून डॉक खलाशी संघटनेचे अध्यक्ष विश्वनाथ म्हात्रे,ठाणे पालघर जिल्हा अध्यक्ष राजेंद्र मेहेर आणि इतर मान्यवर उपस्थित होते.तर हर्णे,मंडणगड,गुहागर,रत्नागिरी,रायगड,पालघर,सातपटी,आणि मुंबईतील विविध कोळीवाड्यातील कोळी बांधव व कोळी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
यावेळी आपल्या अध्यक्षीय भाषणात आमदार राज पुरोहित म्हणाले की,जरी मी मासे खात नसलो तरी माझे कोळी समाजावर मनापासून प्रेम आहे.एलईडी लाईटद्वारे पर्ससीन नेटने मासेमारी करणाऱ्यांवर केंद्र शासनाच्या कृषी मंत्रालयाने गेल्या १० नोव्हेंबर रोजी बंदीचे आदेश दिले आहेत.गोवा व गुजराथ राज्यात या कायद्याची ठोस अंमलबजावणी होते,मग महाराष्ट्रात का होत नाही असा सवाल त्यांनी केला.या कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी लवकरच आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय कृषी मंत्री राधा मोहनसिंग यांची बैठक आयोजित करू.तसेच विधानसभेत अधिनियम 293 अन्वये व लक्षवेधी सुचनेद्वारे सरकारचे लक्ष वेधू असे ठोस आश्वासन दिले.
यावेळी आमदार संजयराव कदम म्हणाले की, सुमारे 10 लाखांचे प्रखर एलइडी लाईट्ने 12 नॉटिकल वाव अंतराच्या आत होणाऱ्या या पर्सीसेन मासेमारीमुळे भविष्यात समुद्रातील मत्स्यसाठा संपून मश्चिमारांवर उपासमारीची पाळी येईल.त्यामुळे हर्णे बंदरातून एलइडी लाईटस मासेमारीच्या विरोधात पसरलेले आंदोलन राज्यातील सर्व किनारपट्टीवर निश्चित पसरेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
आमदार अशोक पाटील व आमदार राहुल नार्वेकर यांनी देखिल या मासेमारी विरोधात दंड थोपटण्याचे आश्वासन दिले. एलईडी लाइटसद्वारे मासेमारी करणारे फक्त 5 टक्के श्रीमंत मश्चिमारांसाठी 95 टक्के कष्टकरी
मश्चिमारांना वेठीस धरले जात असून राज्याचे मत्स्यव्यवसाय खाते या दोघांमध्ये वाद व भांडणं निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे असा आरोप त्यांनी केला.
यावेळी मत्स्यव्यवसाय खात्याचे अधिकारी राजेंद्र जाधव विनोद नाईक या कायद्याची अंमलबजावणी करत नासल्याबद्धल त्यांनी कडाडून टीका केली. एलईडी लाईटद्वारे पर्सेसेन नेटने होणाऱ्या मासेमारीची गांभीर्याने नोंद घेऊन ० ते १२ सागरी मैल व त्याच्यापुढे ईईझेड क्षेत्रामध्ये कार्यवाही करून एलईडी लाईट ईईझेड क्षेत्रामध्ये भारतीय तटरक्षक दलाची मदत घेऊन कार्यवाही त्वरित करण्याबाबत मत्स्यव्यवसाय विभागाकडे मागणी केल्याची माहिती समितीचे कार्याध्यक्ष रामकृष्ण तांडेल यांनी केली आहे.मात्र असे असताना महाराष्ट्रात वरील पद्धतीची मासेमारी आजही खुलेआम सुरुच आहे. मत्स्यव्यवसाय खात्याच्या अधिकाऱ्यांना वारंवार तक्रारी करूनसुद्धा त्यांच्यावर कारवाई करीत नाहीत,उलटपक्षी गेल्या ५ जानेवारी रोजी परिपत्रक काढून मश्चिमार सहकारी संस्थांवर कारवाई करण्याचे कळविले आहे. हि बाब फार संतापजनक आणि दुर्दैवी अशी टीका त्यांनी केली.
अशाच प्रकारे जर पुढे मासेमारी सुरु राहिली तर मोठ्या प्रमाणात मत्स्यसाठे नाहीसे होतील आणि समुद्रात मासळी मिळणार नाही. त्यामुळे मश्चिमारांवर रोजी-रोटीचा प्रश्न निर्माण होईल व आजच्या घडीस पारंपरिक मश्चिमारांची दयनीय परिस्थिती निर्माण झाली आहे त्यांच्यावर उपासमारीची वेळ येईल.याबाबत नुकतीच हर्णे आणि दापोली तसेच कुलाबा, कफ परेड येथे झालेल्या जाहीर सभेत मोठा उद्रेक झाला होता याची आठवण यावेळी लिओ कोलासो व किरण कोळी यांनी दिली.जर सरकार कार्यवाही करत नसेल तर कायदा हातात घेऊन समुद्रमध्ये लढाई करून एल इ डी मासेमारी बंद करण्याचा इशारा यावेळी त्यांनी शेवटी दिला.