गोड बोलणे बंद करा, विद्यार्थ्यांचे प्रश्न मार्गी लावा
By ऑनलाइन लोकमत | Published: December 8, 2018 01:25 AM2018-12-08T01:25:41+5:302018-12-08T01:25:48+5:30
मुंबई विद्यापीठाच्या अनागोंदी कारभाराची अनेक प्रकरणे गेल्या काही दिवसांपासून समोर आली आहेत.
मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या अनागोंदी कारभाराची अनेक प्रकरणे गेल्या काही दिवसांपासून समोर आली आहेत. विद्यार्थ्यांच्या कोणत्याही समस्यांबाबत मुंबई विद्यापीठाकडून कोणताही ठोस निर्णय मात्र होत नाही. तसेच सिनेट सदस्यांच्या आणि संघटनांच्या पत्रांना मुंबई विद्यापीठाकडून उत्तरे मिळत नसल्याचे समोर आले आहे. मुंबई विद्यापीठाच्या या भोंगळ कारभाराला कंटाळून अखेर शुक्रवारी याविरोधात युवा सेनेसह इतर सर्व सिनेट सदस्यांनी कुलगुरू डॉ. सुहास पेडणेकर यांच्या दालनात आंदोलन केले.
या वेळी सिनेट सदस्यांनी विद्यार्थी प्रश्न मार्गी लावा, गोड बोलणे बंद करा, अशा घोषणा दिल्या आणि कुलगुरूंना घेराव घातला. सिनेट सदस्य इथेच न थांबता त्यांनी कुलगुरू सुहास पेडणेकर यांच्याकडून चर्चा करून लेखी स्वरूपात काही मागण्याही मान्य करून घेतल्या असल्याची माहिती सिनेट सदस्य वैभव थोरात यांनी दिली.
मुंबई विद्यापीठाचा परीक्षा विभागाचा नव्या उत्तरपत्रिका छापण्याचा निर्णय, रत्नगिरी उपकेंद्राची झालेली अवस्था अशा अनेक मागण्यांसंदर्भात कुलगुरू कार्यालयाकडून यासंदर्भात कोणतेही उत्तर देण्यात आलेले नाही. याचा निषेध म्हणून सिनेट सदस्यांकडून हातात पोस्टर्स घेऊन सुहास पेडणेकर यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
‘कुलगुरू गोड बोलणे बंद करा, पत्रांना उत्तर द्या’ अशा घोषणा देत कुलगुरूंच्या समोरच जमिनीवर बसून सदस्यांनी ठिय्या आंदोलन सुरू केले. या वेळी युवा सेनेचे सिनेट सदस्य प्रदीप सावंत, सुप्रिया कारंडे, वैभव थोरात, शशिकांत झोरे, शीतल देवरूखकर यांच्यासह कार्यकारी सदस्य साईनाथ दुर्गे आदी आंदोलनात सहभागी झाले होते.
>या मागण्या केल्या मान्य
यापुढे प्रत्येक महिन्याच्या पहिल्या शनिवारी नोंदणीकृत पदवीधर सिनेट सदस्यांची बैठक कुलगुरू व इतर अधिकाऱ्यांसोबत घेण्याची मागणी मान्य करून घेण्यात आली. तसेच १४ डिसेंबरला कुलगुरू आढावा बैठक घेणार असून पुढील मागण्यांचा आराखडा देणार आहेत. यामध्ये ते कलिना विद्यापीठातील सीसीटीव्हीबाबतची सद्य:स्थितीही सादर करणार आहेत.
सिनेट सदस्यांनी दिलेल्या पत्रांचे उत्तर वेळोवेळी देण्यात येईल व यापुढे दिरंगाई होणार नाही, असे कुलगुरूंनी या वेळी आश्वासित केले. कलिना संकुल, ठाणे उपकेंद्र, कल्याण उपकेंद्र, रत्नागिरी उपकेंद्र येथे विद्यार्थ्यांना मार्कशीट मिळेपर्यंत सेट अप तयार करण्यात येईल, असेही या वेळी सांगण्यात आले.