टर्निंग पॉइंट: अचानकपणे मिळाली आमदार होण्याची संधी; कळत्या वयात पाहिलेले स्वप्न पूर्ण झाले
By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2023 01:15 PM2023-11-20T13:15:57+5:302023-11-20T13:20:31+5:30
कौटुंबिक वातावरण रा. स्व. संघाच्या मुशीतले. नंतर भाजपचे काम आणि शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर मिळालेली आमदारकीची संधी. असा माझा आजवरचा राजकीय प्रवास. तो अजूनही नवी आव्हाने स्वीकारत अविरत सुरू आहे.
अंधेरीच्या एका कॉलेजमध्ये शिकवत असताना टेम्पररी स्टाफप्रमाणे मला टर्मिनेट केले,' परंतु हे टर्मिनेशन मी केलेल्या बंडामुळे मिळालेले होते. माझ्या जागी एका इच्छुक नसलेल्या प्राध्यापकाला जबरदस्तीने नियुक्त केले. ठाण्याच्या कॉलेजमध्ये शोध घेतल्यावर समजले, की त्यांनी तिकडची नोकरी न सोडताच माझ्या जागी अंधेरीत नोकरी सुरू केली होती. मग माझ्यातली बंडखोर वृत्ती जागी होऊन मी थेट ठाण्यातील प्राचार्यांना भेटले. या गोष्टीचा छडा लावला. त्यातून दोन गोष्टी साध्य झाल्या. एकतर त्या प्राध्यापकाला ठाण्याच्या महाविद्यालयात कायमस्वरूपी नोकरी मिळाली आणि मला मी शिकवत असलेल्या अंधेरीच्या महाविद्यालयात पुन्हा रुजू करून घेतले गेले. या गोष्टीची दखल मुंबई विद्यापीठाने घेतली.
माझे आई-वडील सुशीला आणि डॉ. श्यामसुंदर कायंदे हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कट्टर कार्यकर्ते. वडील उत्साही स्वयंसेवक. ते स्वतः कारसेवेसाठी तीनवेळा अयोध्येला गेले होते. त्यावेळी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष मुरली मनोहर जोशी होते. तेव्हा फेब्रुवारी १९९३ मध्ये दिल्लीला रॅली झाली. मी भाजपची सदस्य नव्हते, परंतु त्यात सामील झाल्यावर पोलिसांकडून लाठीमार झाला. अश्रुधूर सोडण्यात आला. तेव्हा प्रथमच पोलिसांच्या लाठीचा फटका कमरेवर बसला. यानंतर दहा किलोमीटरवर उत्तर प्रदेशातल्या सीमेवर आम्हाला सोडण्यात आले आणि सक्रिय राजकारणात माझा प्रवेश झाला.
त्यानंतर अनेक वर्षे भाजपचे काम केले. विविध पदे मिळाली. १९९७ मध्ये माटुंग्यातून वॉर्ड क्रमांक ४१ मधून निवडणूक लढण्याची संधी मिळाली. खरे तर हा वॉर्ड युतीमध्ये शिवसेनेच्या वाट्याला आला होता. परंतु, त्या वॉर्डात रमेश किणींच्या पत्नी शीला किणी राहत होत्या. स्वाभाविकपणे काँग्रेसने हा विषय शिवसेना-भाजपवर उलटवला आणि अवघ्या अडीचशे मतांनी माझा पराभव झाला. २००८ मध्ये भाजपमध्ये पहिली महिला जिल्हाप्रमुख म्हणून मला जबाबदारी मिळाली. लगेचच २००९ मध्ये शीव- कोळीवाडा विधानसभेतून मला विधानसभेसाठी उमेदवारी दिली. या निवडणुकीत मी दुसऱ्या क्रमांकावर होते. तेव्हा मनसेची लाट होती. माझ्या पराभवाचे ते एक कारण ठरले. विधानसभेत पदार्पणाची इच्छा मात्र पूर्ण झाली नाही.
२०१२ मध्ये भारतीय जनता पक्ष सोडून थेट शिवसेनेत प्रवेश केला. २०१८ मध्ये ध्यानीमनी नसताना शिवसेनेकडून विधानपरिषदेत जाण्याची संधी अचानकपणे मिळाली. २ जुलैला अर्ज भरला आणि ९ जुलैला बिनविरोध निवड झाली आणि कळत्या वयात जे स्वप्न पाहिले होते, ते पूर्ण झाले!
-प्रा. डॉ. मनीषा कायंदे, आमदार विधानपरिषद, प्रवक्ता व सचिव, शिवसेना