टर्निंग पॉईंट... सरांच्या त्या प्रश्नांमुळे आयुष्याला कलाटणी
By ऑनलाइन लोकमत | Published: February 5, 2024 11:36 AM2024-02-05T11:36:40+5:302024-02-05T11:37:06+5:30
स्वत:कडून माझ्या खूप अपेक्षा होत्या, स्वप्नं होती; पण तिथे पोहोचण्याचा मार्ग दिसत नव्हता.
सदानंद दाते
मला गणितं सोडवायचा कंटाळा, सर्व भाषांचे व्याकरण गोल. वळणाचा, शिस्तीचा, डोळस अभ्यासाचा अभाव होता. त्याचा परिणाम परीक्षेतील यशावर व्हायचा. शिकताना मी नोकरी करत होतो, वर्तमानपत्र टाकण्याचं कामही करायचो. त्यामुळे घरूनही परीक्षेत अधिक चांगले गुण मिळवण्यासाठी काही दबाव नव्हता.
स्वत:कडून माझ्या खूप अपेक्षा होत्या, स्वप्नं होती; पण तिथे पोहोचण्याचा मार्ग दिसत नव्हता. अकरावीच्या दुसऱ्या सहामाहीत मला चित्रपटाचा नाद लागला. वर्षभरात मी १०० सिनेमे पाहिले असतील. शिवाय मराठीतून इंग्रजीततील प्रवेशाचा अभ्यासावर दुष्परिणाम होणं साहजिक होतं.
याचवेळी कथाकथन, वक्तृत्व, वादविवादात माझी कामगिरी चांगली होती. एफवायमध्ये अशाच आंतरमहाविद्यालयीन वादविवाद स्पर्धेत यश मिळाल्याचं मी प्राध्यापकांना सांगायला गेलो. माझ्या आयुष्याला कलाटणी देणारा प्रसंग तिथे घडला. वादविवाद मंडळाचं काम प्रा. गीताराम गायकवाड आणि प्रा. दाढे बघत. पारितोषिक बघितल्यानंतर दाढे सरांनी मी कोणत्या वर्गात, कोणत्या शाखेत शिकतो याची चौकशी केली. ते प्रथम वर्ष वाणिज्यच्या चारही वर्गांना शिकवत. मी कधीच त्यांच्या तासांना बसलो नसल्याचे त्यांच्या लक्षात आलं. त्यांनी गुण विचारले, वह्या बघितल्या. म्हणाले, ‘तू स्पर्धांत चांगलं यश मिळवू शकतोस, तर परीक्षेत का नाही? अभ्यासाची पद्धत माहीत नसेल, शिस्त नसेल, तर कितीही हुशार असलास तरी चांगले गुण कसे पडतील?’ हे प्रश्न कठोर होते. त्याने माझे डोळे उघडले. मी दाढे सरांकडून अभ्यास कसा करायचा, परीक्षेत माहितीचं, ज्ञानाचं सादरीकरण कसं करायचं हे शिकलोच, पण मोठ्या स्वप्नांपर्यंत जाण्याचा मार्ग शोधायला शिकलो.
पुढे पाच वर्षे मी खूप अभ्यास केला. ‘हाऊ टु स्टडी’ हे हॅरी मॅडॉकस यांचं पुस्तक आणि याच विषयावरचं ‘अभ्यास कसा करावा’ हे पुस्तक वाचले. बी.कॉम.सोबतच मी आयसीडब्ल्यूए कॉस्ट अकाउंटन्सीच्या परीक्षा देण्याचं ठरवलं. त्यासाठी इंडसर्च, नंतर यूजीसीचं रानडे इन्स्टिट्यूटचं आणि ज्ञानप्रबोधिनीचं वाचनालय यांचा खूप उपयोग करून घेतला. विषय मुळापासून समजावून घेऊन अभ्यासाचा चांगला परिणाम झाला आणि १९८७, १९८८ आणि १९८९ या तीन वर्षांत मी बी.कॉम., आयसीडब्ल्यूए आणि यूपीएससी या परीक्षा एकापाठोपाठ चांगल्या प्रकारे उत्तीर्ण झालो.
कामाचे उत्तम नियोजन, कठोर शिस्त, सातत्यपूर्ण परिश्रम या त्यावेळी शिकलेल्या गोष्टी फक्त अभ्यासातच नाही तर कामात देखील मला उपयोगी ठरल्या आहेत.
(लेखक राज्य दहशतवाद विरोधी विभागाचे प्रमुख आहेत)