३ लाख ७५ हजार ग्राहकांकडे १६५ कोटी ८८ लाखांची चालू थकबाकी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2018 05:38 PM2018-06-12T17:38:37+5:302018-06-12T17:38:37+5:30
'वीज ग्राहकांकडून मे व जून महिन्यात विजेचा सर्वाधिक वापर होतो. त्यामुळे जून व जुलै महिन्यात होणाऱ्या बिलाची रक्कम अधिक मोठी असते. या सर्व बिलांची योग्य वसुली झाली नाही तर महावितरणची थकबाकी वाढत जाते.
मुंबई : 'वीज ग्राहकांकडून मे व जून महिन्यात विजेचा सर्वाधिक वापर होतो. त्यामुळे जून व जुलै महिन्यात होणाऱ्या बिलाची रक्कम अधिक मोठी असते. या सर्व बिलांची योग्य वसुली झाली नाही तर महावितरणची थकबाकी वाढत जाते. यामुळे आर्थिक वर्षाच्या शेवटी म्हणजेच फेब्रुवारी व मार्च महिन्यात महावितरण कर्मचाऱ्यांवर कामाचा अधिकचा ताण येतो. तर थकबाकीदार ग्राहकाला दंडाची अधिकची रक्कम भरावी लागते. या सर्व बाबी टाळण्याकरता जनमित्रांनी दोन महिन्याहून अधिक काळ चालू थकबाकी असलेल्या किमान पाच ते दहा ग्राहकांची तात्काळ वीज जोडणी तोडावी.', असे आदेश भांडूप नागरी परिमंडलाचे मुख्य अभियंता (प्रभारी) रफिक शेख यांनी दिले आहेत. ते भांडूप नागरी परिमंडलात आयोजीत वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीत बोलत होते.
भांडूप नागरी परिमंडलाअंतर्गत मुंबई, ठाणे व नवी मुंबई परिसरातील सुमारे १८ लाख हून अधिक ग्राहकांना वीज सेवा पुरवण्यात येते. भांडूप नागरी परिमंडलाअंतर्गत सुमारे ३ लाख ७५ हजार ग्राहकांकडे ३१ मे २०१८ अखेर १६५ कोटी ८८ लाख इतकी चालू थकबाकी आहे. यामध्ये ठाणे मंडल मधील २ लाख ११ हजार ग्राहकांकडे १११ कोटींची तर वाशी मंडल मधील एक लाख ६४ हजार ग्राहकांकडे ५४ कोटी ७८ लाख इतक्या चालू थकबाकीचा समवेश होतो.
मुख्य अभियंता (प्रभारी) रफिक शेख म्हणाले, 'दोन महिन्यांहून अधिक काळ चालू थकबाकी असलेले जास्तीत जास्त पाच ते दहा ग्राहकांचे उद्दिष्ट लाईनस्टाफला दररोजचे देण्यात यावे. लाईनस्टाफने दिलीले काम योग्य प्रकारे केले तरच त्यांचा पगार करण्यात यावा. कामचुकार कर्मचाऱ्यांना तात्काळ नोटीस देण्यात यावी तसेच त्यांचे पगार थांबवावेत. तसेच होणाऱ्या दररोजच्या कामाची नोंद वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ठेवावी. वरिष्ठ अधिकाऱ्यांचा पगार हा त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या कामावर अवलंबून राहणार असून शाखा कार्यालयांकडून अपेक्षित काम झाले तरच त्यांचा पगार होणार आहे.' थकबाकी वसुली बरोबरच ग्राहकांना चांगली सेवा पुरवण्याकडे लक्ष द्यावे. असा आदेशही मुख्य अभियंता (प्रभारी) रफिक शेख यांनी दिले आहेत.
या बैठकीस भांडूप परिमंडलाच्या कार्यकारी अभियंता(प्रशासन) शुभांगी कटकधोंड, भांडुप विभागाचे कार्यकारी अभियंता राजेश थूल, मुलुंड विभागाच्या कार्यकारी अभियंता सारिका खोब्रागडे, वागळे इस्टेटचे कार्यकारी अभियंता अनिल पाटील, ठाणे-१ विभागा चे कार्यकारी अभियंता अरविंद बुलबुले, ठाणे-२ विभागाचे कार्यकारी अभियंता अशोक थोरात, ठाणे-३ विभागाचे कार्यकारी अभियंता पांडुरंग हुंडेकरी, नेरुळ विभागाचे कार्यकारी अभियंता सिंहाजीराव गायकवाड, वाशी विभागाचे कार्यकारी अभियंता प्रवीण अन्नछत्रे, पनवेल विभागाचे कार्यकारी अभियंता माणिक राठोड, ठाणे चाचणी विभागाचे कार्यकारी अभियंता प्रकाश राऊत, वाशी चाचणी विभागाचे कार्यकारी अभियंता संजय पाटील, सहाय्यक महाव्यवस्थापक नेमिलाल राठोड, उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी महेंद्र चुनारकर, अतिरिक्त कार्यकारी अभियंता(पायाभूत आरखडा)रोहित जोगदंड, व्यवस्थापक (विवले) श्रीराम चव्हाण, उपकार्यकारी अभियंता दिलीप शेट्टी व जनसंपर्क अधिकारी विश्वजीत भोसले तसेच भांडुप परिमंडळातील इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.