मासिक भाड्यात मात्र वाढ नाही
मुंबई : कोरोना संक्रमणामुळे आलेली आर्थिक मंदी आणि सुरक्षित व मोठ्या घरांची निर्माण झालेली गरजेमुळे मुंबईतील भाडे तत्वावरील घरांची उलाढालही वाढली आहे. आर्थिक अरिष्ट आल्यामुळे अनेकांनी जास्त भाडे असलेली घरे सोडून कमी भाडे असलेल्या घरांमध्ये स्थलांतर सुरू केले आहे. तर, कोरोना काळात ज्यांना आपली घरे असुरक्षित आणि अपूरी वाटत होती ते सुरक्षित निवा-यांना प्राधान्य देताना दिसत आहेत. परंतु, त्यामुळे या व्यवहारांची उलाढाल वाढली असली तरी प्रत्यक्षात घर भाड्याची रक्कम मात्र ५ ते १० टक्क्यांनी कमी झाल्याचे या क्षेत्रातील व्यावसायिकांचे म्हणणे आहे.
कोरोना संक्रमणाच्या पहिल्या तीन महिन्यांत घरांच्या आणि व्यावसायिक जागांच्या खरेदी विक्रीचे व्यवहार जवळपास बंद झाले होते. मात्र, सप्टेंबर महिन्यापासून त्यात तेजी निर्माण झाली आहे. गेल्या वर्षी सप्टेंबर ते डिसेंबर या कालावधीत या कालावधीत भाडे तत्वावरील घरांचे ७६,५३९ व्यवहार मुंबईत नोंदविले गेले होते. यंदा २० डिसेंबरपर्यंत नोंदणी झालेल्या व्यवहारांची संख्या ८१,३०५ इतकी आहे. गेल्या वर्षी दररोज होणा-या सरासरी व्यवहारांची संख्या ८०५ होती. ती यंदा १०१६ पर्यंत वाढली आहे. डिसेंबर महिन्याअखेरीपर्यंत गेल्या वर्षीच्या तुलनेत सुमारे १५ हजार जास्त व्यवहार नोंदविले जातील अशी चिन्हे आहेत.
कोरोना संकटामुळे अनेकांना नोक-या गमवाव्या लागल्या आहेत. बहुतांश लोकांचे वेतन कमी झाले आहे. तसेच, व्यावसायिकांची आवकही लक्षणीयरित्या घटली आहे. त्यामुळे भाडे तत्वावरील मोठी घरे सोडून कमी आकाराच्या घरांमध्ये स्थलांतर करण्याचे प्रमाण वाढले आहे. त्याशिवाय अनेक छोटी घरे कोरोना संक्रमाणाच्या काळात अडचणीची ठरली होती. वर्क फ्राँम होम, मुलांच्या आँनलाईन शाळांसाठी ही जागा अपुरी पडत असल्याने मोठी घरे घेण्या-यांची संख्या सुध्दा वाढताना दिसत आहे. त्यामुळे व्यवहार वाढताना दिसतात. परंतु, घर भाडेतत्वावर देताना पूर्वीएवढे भाडे देण्यास कुणी तयार होत नाही. त्यामुळे मालकांना कमी दरांत तडजोड करावी लागत असलयाची माहिती शांती रिअल्टर्स आणि बाय सेल अँण्ड रेंट या रिअल इस्टेट ब्रोकर कंपन्यांच्या प्रतिनिधींनी दिली आहे.
मुद्रांक शुल्क विभागाकडे नोंद झालेले भाडे करार
महिना | २०१९ | २०२० |
सप्टेंबर | १६,६७९ | १९,६१० |
आँक्टोबर | २१,०१२ | २१,०१२ |
नोव्हेंबर | १८,८४२ | १८,८४२ |
डिसेंबर | २०,००६ | १८,६४० (२० तारखेपर्यंत) |
एकूण | ७६,५३९ | ८१,३०५ |