Join us

तिच्या मजल्यावरील लाइट सारखा चालूबंद करायचा; आरोपीने केला होता जवळीक साधण्याचा प्रयत्न

By मनीषा म्हात्रे | Published: June 08, 2023 8:55 AM

‘त्या’ तरुणीच्या वडिलांचा टाहो.

मनीषा म्हात्रे, लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : पंधरा दिवसांपूर्वीच आरोपी ओमप्रकाश कनोजिया याने लेकीची छेड काढून तिच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न केला होता. चार दिवसांपूर्वी तिने याबाबत मैत्रिणीला सांगितलेही होते. तसेच कनोजिया तिच्या मजल्यावरील लाइट सारखा चालूबंद करायचा. तिने आम्हाला ते सांगितले होते. मात्र, हीच बाब वसतिगृहाच्या वॉर्डनना सांगण्यास ती घाबरत होती. तिने याबाबत वेळीच सांगितले असते तर ती आज वाचली असती, असा टाहो फोडत मृत तरुणीच्या वडिलांनी अश्रूंना वाट मोकळी करून दिली. वसतिगृह अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे मुलीला जीव गमवावा लागला, असा आरोपही त्यांनी केला आहे.

चर्नी रोड येथील शासकीय वसतिगृहात तरुणीवर अत्याचार करून तिची हत्या केल्याच्या घटनेने मुंबई हादरली आहे. मूळची अकोला येथील असलेल्या १८ वर्षीय तरुणीची निर्घृण हत्या करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला. तिचे शोकसंतप्त नातेवाईक बुधवारी मुंबईत आले होते. तिचा भाऊ पुण्यात उच्च शिक्षण घेत आहे. तर वडील अकोल्यात स्थानिक पत्रकार आहेत. संबंधित तरुणी २०२१ पासून वांद्रेतील कॉलेजात तंत्रशिक्षण घेत होती. सोमवारी रात्री अकराच्या सुमारास ती मैत्रिणीसोबत वसतिगृहात आली. त्यानंतर, दुसऱ्या दिवशी तिचा विवस्त्रावस्थेत मृतदेह आढळून आला.

मुलीचे वडील म्हणाले...

- माझ्या मुलीला एकटीला चौथ्या मजल्यावर ठेवले. तिच्यासोबत दुसऱ्या कोणत्याही मुलीला का ठेवले नाही?

- तिने अनेकदा एकटीला भीती वाटत असल्याचे सांगितले. तसेच, मुलीच्या काळजीपोटी तिच्या मैत्रिणींसह तेथील सुरक्षारक्षकाशी माझे बोलणे व्हायचे. तो काळजी करू नका, मुलगी व्यवस्थित आहे. माझं लक्ष आहे असे सांगायचा. मात्र, रक्षकच भक्षक निघेल असे स्वप्नात देखील वाटले नव्हते. 

- पंधरा दिवसांपूर्वी आरोपीने मुलीसोबत जवळीक साधण्याचा प्रयत्न केला होता. तिने याबाबत मैत्रिणीला सांगितले. मुलीच्या हत्येनंतर मैत्रिणीकडून याबाबत समजले. 

- कनोजिया अनेकदा रात्रीच्या सुमारास लाइट चालू-बंद करत असल्याचे सांगताच मुलीला तत्काळ वॉर्डनशी बोलण्यास सांगितले होते. मात्र, ते कारवाई करणार नाहीत, मलाच ओरडतील या भीतीने तिने कुणाला काही सांगितले नाही. 

- मुलीने अनेकदा शिफ्टिंगबाबत सांगूनही त्याकडे दुर्लक्ष केले गेले. संबंधितांवर कारवाई होणे गरजेचे आहे. जोपर्यंत हॉस्टेलच्या संबंधिताविरुद्ध गुन्हा दाखल होणार नाही तोपर्यंत मुलीचा  मृतदेह ताब्यात घेणार नाही. 

टॅग्स :गुन्हेगारीमुंबई