Join us  

खिचडीमध्ये उंदराची पिल्ले

By admin | Published: March 22, 2015 1:06 AM

पालिका शाळेतील विद्यार्थी दोन वर्षे सुगंधित दुधापासून वंचित असताना निकृष्ट दर्जाच्या शालेय पोषण आहारानेही त्यांच्या तोंडची चव पळवली आहे़

मुंबई : पालिका शाळेतील विद्यार्थी दोन वर्षे सुगंधित दुधापासून वंचित असताना निकृष्ट दर्जाच्या शालेय पोषण आहारानेही त्यांच्या तोंडची चव पळवली आहे़ चेंबूरच्या एका पालिका शाळेत विद्यार्थ्यांसाठी आणलेल्या खिचडीत उंदराची मेलेली पिल्ले सापडली. खिचडी पुरविणाऱ्या महिला बचत गटाला पालिकेच्या शिक्षण विभागाने कारणे दाखवा नोटीस धाडून काळ्या यादीत टाकण्याचा इशारा दिला आहे. चेंबूर नाका येथील एमटीएस शाळेत दुपारच्या वेळेत विद्यार्थ्यांना खिचडी देण्यात आली़ मात्र दोन विद्यार्थ्यांच्या ताटात उंदराची मेलेली पिल्ले सापडली़ ताटात उंदीर पाहून विद्यार्थ्यांना मळमळू लागले़ त्यामुळे तत्काळ त्यांना औषधोपचार देण्यात आले़ मात्र सुदैवाने त्यांची प्रकृती स्थिर आहे़ शाळेच्या व्यवस्थापानाने याबाबतची सूचना ताबडतोब शिक्षण खात्याला दिली़ त्यानुसार शिक्षण खात्याने महिला बचत गटाला नोटीस पाठवली आहे़ या बचत गटाकडून सुरू असलेला पुरवठाही बंद करण्यात आला आहे़सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या बचत गटाकडून चार शाळांना खिचडीचा पुरवठा करण्यात येतो़ ठेकेदार एकच असला तरी चेंबूर पश्चिममधील २५ ते ३० शाळांना विविध नावांनी खिचडीचा पुरवठा केला जात आहे़ मात्र या घटनेनंतरही शिक्षण खात्याने अद्याप या बचत गटाला काळ्या यादीत टाकलेले नाही़ दरम्यान, याबाबतचा जाब नोटीसद्वारे विचारून काळ्या यादीत टाकण्याचा इशारा शिक्षण अधिकाऱ्यांनी संबंधित बचत गटाला दिला आहे़ (प्रतिनिधी)च्पोषण आहारांतर्गत पालिकेच्या साडेचार लाख विद्यार्थ्यांना खिचडीचा पुरवठा केला जातो़च्जानेवारी २०१५मध्ये माटुंगा येथील दयानंद बालक विद्यालय शाळेतील २४ विद्यार्थ्यांना खिचडी खाऊन विषबाधा झाली होती़च्१३ आणि १४ वयोगटातील या विद्यार्थ्यांच्या पोटात मळमळ व उलट्या होऊ लागताच सायन रुग्णालयात दाखल केले होते़च्नोव्हेंबर २०१४मध्ये देवनार पालिका शाळेतील इयत्ता चौथीतील विद्यार्थ्यांच्या खिचडीत अळ्या सापडल्या होत्या़च्नोव्हेंबर २०१३ मध्ये साकीनाका येथील अंजुमन नरुला उर्दू हायस्कूलच्या ४०० विद्यार्थ्यांना केकने विषबाधा झाली होती़