तेलतुंबडे यांना १२ मार्चपर्यंत अटकेपासून संरक्षण - हायकोर्ट
By ऑनलाइन लोकमत | Published: March 7, 2019 05:25 AM2019-03-07T05:25:35+5:302019-03-07T05:25:40+5:30
नक्षलवाद्यांशी कथित संबंध असल्याच्या प्रकरणी ज्येष्ठ विचारवंत डॉ. आनंद तेलतुंबडे यांच्या अटकपूर्व जामिनावरील सुनावणी उच्च न्यायालयाने १२ मार्चपर्यंत तहकूब करत तोपर्यंत त्यांना अटकेपासून संरक्षण दिले.
मुंबई : नक्षलवाद्यांशी कथित संबंध असल्याच्या प्रकरणी ज्येष्ठ विचारवंत डॉ. आनंद तेलतुंबडे यांच्या अटकपूर्व जामिनावरील सुनावणी उच्च न्यायालयाने १२ मार्चपर्यंत तहकूब करत तोपर्यंत त्यांना अटकेपासून संरक्षण दिले.
तेलतुंबडे यांनी अटकपूर्व जामिनासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. त्यावरील सुनावणी न्या. एम. डब्ल्यू. सांबरे यांच्या एकसदस्यीय खंडपीठापुढे बुधवारी होती. तेलतुंबडे यांना २ फेब्रुवारीला मुंबई विमातळावरून पहाटे अटक केली. वास्तविक सर्वोच्च न्यायालयाने त्यांची गुन्हा रद्द करण्याची याचिका फेटाळताना त्यांना ११ फेब्रुवारीपर्यंत अटकेपासून संरक्षण देत संबंधित न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज करण्याची मुभा दिली. त्यानंतर तेलतुंबडेंनी पुणे सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला. १ फेब्रुवारीला न्यायालयाने तो फेटाळला आणि २ फेबु्रवारीला पुणे पोलिसांनी त्यांना मुंबई विमानतळावर अटक केली.
सर्वोच्च न्यायालयाने ११ फेब्रुवारीपर्यंत अटकेपासून संरक्षण दिले असताना पुणे पोलिसांनी तेलतुंबडेंना केलेली अटक बेकायदा आहे, असे म्हणत पुणे सत्र न्यायालयाने पोलिसांना तेलतुंबडे यांना तत्काळ सोडण्याचे आदेश दिले. त्यानंतर तेलतुंबडे यांनी न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी धाव घेतली.
एल्गार परिषदेत अनेकांनी चिथावणीखोर भाषणे दिल्याने दुसऱ्याच दिवशी कोरेगाव भीमा येथे जातीय दंगल उसळली. शहरी नक्षलवाद प्रकरणी पोलीस तपास करत असताना या घटनेशी आनंद तेलतुंबडे यांचा संबंध असल्याचे निदर्शनास आल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.