इंधन दरवाढीविरोधात आज टिष्ट्वटर मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2018 04:42 AM2018-06-02T04:42:04+5:302018-06-02T04:42:04+5:30
इंधन दरवाढीवरून देशभर लोकांमध्ये संतापाची भावना आहे.
मुंबई : इंधन दरवाढीवरून देशभर लोकांमध्ये संतापाची भावना आहे. विशेषत: मुंबई महाराष्ट्रात राज्य सरकारच्या विविध करांमुळे नागरिकांना सर्वांत महाग पेट्रोल आणि डिझेल खरेदी करावी लागत आहे. या इंधन दरवाढीविरोधात मुंबई काँग्रसने अनोख्या टिष्ट्वटर आंदोलनाचे आयोजन केले आहे. शनिवार, २ जून रोजी पक्षाच्या वतीने टिष्ट्वटरवर इंधन दरवाढ मागे घेण्यासाठी मोर्चा काढण्यात येणार असल्याचे मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांनी सांगितले.
टिष्ट्वटर आंदोलनाच्या माध्यमातून सततच्या इंधन दरवाढीवरून सामान्य जनतेच्या मनात असलेला संताप, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत पोहोचविण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे. पंतप्रधान मोदी सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असतात. काँग्रेसने यापूर्वी इंधन दरवाढीविरोधात रस्त्यावर उतरून आंदोलन केले. मात्र, रस्त्यावर उतरलेल्या जनतेच्या वेदना मोदी आणि फडणवीस सरकारला समजत नाहीत. त्यामुळे त्यांना टिष्ट्वटरच्या माध्यमातून जागे करण्याचा आमचा प्रयत्न आहे, असे निरुपम यांनी सांगितले.
गेल्या वर्षी बँकांकडून अनावश्यक शुल्क आकारणीविरोधात टिष्ट्वट मोर्चा काढण्यात आला होता. या टिष्ट्वटर मोर्चामुळे ७२ तासांमध्ये आॅनलाइन डिजिटल व्यवहारांवरील शुल्क कमी केले होते. म्हणूनच या वर्षी इंधन दरवाढीविरोधातही आम्ही असाच टिष्ट्वटर मोर्चा काढत आहोत, असे सांगून जास्तीतजास्त लोकांनी या टिष्ट्वटर मोर्चामध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन निरुपम यांनी केले.