बारावीच्या निकालाला विलंब होण्याची शक्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2021 04:06 AM2021-07-22T04:06:30+5:302021-07-22T04:06:30+5:30

पावसाच्या अडथळ्यामुळे संगणक प्रणाली खंडित होण्याचे प्रकार लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : मागील तीन दिवसांपासून मुंबईत सुरू असणाऱ्या पावसामुळे ...

Twelfth result likely to be delayed | बारावीच्या निकालाला विलंब होण्याची शक्यता

बारावीच्या निकालाला विलंब होण्याची शक्यता

Next

पावसाच्या अडथळ्यामुळे संगणक प्रणाली खंडित होण्याचे प्रकार

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : मागील तीन दिवसांपासून मुंबईत सुरू असणाऱ्या पावसामुळे राज्य शिक्षण मंडळाने बारावीच्या निकालासाठी संकलित गुण भरण्यासाठी उपलब्ध करून दिलेली संगणक प्रणालीच खंडित झाली. बुधवारी बऱ्याच प्रयत्नानंतर ती सुरू झाली. मात्र अजूनही त्यावरील काम हे संथगतीनेच सुरू असल्याच्या तक्रारी शिक्षक करीत आहेत. हीच स्थिती कायम राहिल्यास शाळा, महाविद्यालयांना मंडळाकडे निकाल देण्यास उशीर होऊन मंडळाकडूनही निकाल जाहीर करण्यास विलंब होण्याची शक्यता शिक्षकांकडून व्यक्त केली जात आहे.

बारावीच्या विद्यार्थ्यांचे संकलित गुण संगणक प्रणालीत भरण्यासाठी महाविद्यालयांना २३ जुलैपर्यंत मुदत देण्यात आली आहे. मात्र शिक्षकांना गुण संगणक प्रणालीमध्ये भरण्यास अडचणी येत असल्याचे समोर आले आहे. निकालाच्या कामासाठी बारावीचे शिक्षक शाळा-महाविद्यालयांत उपस्थित होत आहेत. परंतु सर्व्हर डाऊन झाल्याने त्यांना बसून राहावे लागत असल्याच्या तक्रारी मुख्याध्यापक करीत आहेत. मुंबईतील महाविद्यालयात तर शिक्षक रात्रभर संगणक प्रणालीत गुण भरण्यासाठी थांबले होते; पण सर्व्हर डाऊन झाल्याने वेळ वाया गेल्याची माहिती शिक्षकांनी दिली. बुधवारी सकाळी शिक्षकांनी शिक्षणमंत्री, शिक्षण आयुक्त आणि राज्य मंडळाकडे याबाबत तक्रार केली असता त्यांनी दखल घेऊन ती सुरू करून घेतल्याचे त्यांनी सांगितले. मात्र अजूनही संगणक प्रणाली संथ गतीने सुरू असून सर्व्हर डाऊनमुळे गुण भरण्यात अडथळे येत असल्याची माहिती शिक्षक देत आहेत.

मुंबईत बारावीचे जवळपास तीन लाख विद्यार्थी असून त्यापैकी एक लाखाहून अधिक विद्यार्थ्याचे गुण भरणे शिल्लक आहे; तर एक लाख विद्यार्थ्यांचे गुण अद्याप अंतिम झालेले नाहीत. राज्यातील सव्वातेरा लाख विद्यार्थ्यांपैकी सव्वापाच लाख विद्यार्थ्यांचे गुण भरणे बाकी असून पाच लाख विद्यार्थ्यांच्या गुणांचे अंतिम निश्चितीकरण व्हायचे आहे, अशी माहिती कनिष्ठ महाविद्यालयीन संघटनेचे समन्वयक मुकुंद आंधळकर यांनी दिली. पावसामुळे पुढचे दोन दिवसही समस्या कायम राहणार असल्याने निकालाचे काम पूर्ण होण्यास उशीर होणार असल्याचे ते म्हणाले.

...............................

बारावीच्या निकालाबरोबरच अकरावीच्या प्रवेशासाठीही विद्यार्थ्यांना प्रवेश परीक्षा अर्ज दाखल करावे लागत असल्याने संगणक प्रणालीवर ताण येऊन ती संथ होत आहे. गुण भरण्यासाठी चार-पाच दिवस वाढवून देण्याच्या संघटनेच्या भूमिकेबाबत परिस्थिती पाहून आज, गुुरुवारी निर्णय घेतला जाईल असे राज्य मंडळामार्फत सांगण्यात आले आहे.

- मुकुंद आंधळकर, समन्वयक, महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघ

Web Title: Twelfth result likely to be delayed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.