बारावीचा निकाल याच महिन्यात, मूल्यमापन प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर

By ऑनलाइन लोकमत | Published: July 6, 2021 11:18 AM2021-07-06T11:18:27+5:302021-07-06T11:19:07+5:30

कनिष्ठ महाविद्यालयांनी निकालाची कार्यवाही कशी आणि कधीपर्यंत करावी, याचे सविस्तर वेळापत्रक मंडळाकडून जाहीर करण्यात आले आहे

Twelfth results This month, the schedule of the evaluation process is announced | बारावीचा निकाल याच महिन्यात, मूल्यमापन प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर

बारावीचा निकाल याच महिन्यात, मूल्यमापन प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर

Next
ठळक मुद्देकनिष्ठ महाविद्यालयांनी निकालाची कार्यवाही कशी आणि कधीपर्यंत करावी, याचे सविस्तर वेळापत्रक मंडळाकडून जाहीर करण्यात आले आहे

मुंबई - राज्य शिक्षण मंडळाच्या बारावीच्या निकालाचा तिढा अखेर सुटला असून, मंडळाकडून निकालाच्या मूल्यमापनासाठी ३०:३०:४० चे सूत्र जाहीर झाले आहे. हे सूत्र सीबीएसई मंडळाच्या धोरणावरच अवलंबून आहे. यात दहावीच्या परीक्षेतील सर्वाधिक गुण मिळालेल्या तीन विषयांच्या सरासरी गुणांचे ३० टक्के, अकरावीच्या अंतिम निकालातील विषयनिहाय गुणांचे ३० टक्के आणि बारावीच्या वर्षभरातील सत्र परीक्षा, सर्व चाचण्या आणि तत्सम परीक्षांच्या विषयनिहाय गुणांच्या ४० टक्क्यांच्या गुणांचा अंतर्भाव असेल. आता, या मुल्यमापन निकालाचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.

कनिष्ठ महाविद्यालयांनी निकालाची कार्यवाही कशी आणि कधीपर्यंत करावी, याचे सविस्तर वेळापत्रक मंडळाकडून जाहीर करण्यात आले आहे. त्यानुसार, अंतर्गत मूल्यमापनाचे काम शिक्षकांना 7 जुलैपासून सुरु करायचे असून 23 जुलैपर्यंत शाळा, कनिष्ठ महाविद्यालयीन स्तरावर विद्यार्थ्यांचे अंतर्गत मूल्यमापनाचे काम पूर्ण करायचे आहे. तसेच, निकाल तयार करून मंडळाकडे पाठवायचे आहेत. शिक्षणमंत्रीवर्षा गायकवाड यांनी ट्विट करुन यासंदर्भात माहिती दिली आहे. तसेच, खालील संकेतस्थळाला भेट देण्याचेही सूचवले आहे. 

मुख्याध्यापक, प्राचार्यांनी निकाल समितीने प्रमाणित केलेल्या निकालानुसार विद्यार्थ्यांचे विषयनिहाय गुण मंडळाच्या संगणकीय प्रणालीमध्ये भरण्यासाठी 14 जुलै ते 21 जुलै दरम्यान वेळ देण्यात आला आहे. त्यासोबतच समितीने प्रमाणित केलेले विद्यार्थ्यांचे निकाल सीलबंद पाकिटात विभागीय मंडळात 21 जुलै ते 23 जुलै या कालावधीत जमा करायचे आहेत. त्यानंतर उच्च माध्यमिक प्रमाणपत्र म्हणजेच बारावी परीक्षेचा निकाल विभागीय मंडळ व राज्य मंडळ स्तरावर पुढील प्रक्रिया केली जाणार असून 31 जुलैपर्यंत बारावी बोर्डाचे निकाल जाहीर करण्यात येणार आहेत. 

निकालासाठी 7 सदस्यांची समिती

बारावीचा निकाल तयार करण्यासाठी शाळा, कनिष्ठ महाविद्यालयीन स्तरावर मुख्याध्यापक आणि प्राचार्यांसह कमाल ७ सदस्य असलेली निकाल समिती स्थापन करण्याच्या सूचना शिक्षण मंडळाने दिल्या आहेत. हा निकाल कनिष्ठ महाविद्यालयाने वर्षभर घेतलेल्या विषयनिहाय ऑनलाईन तसेच ऑफलाईन पद्धतीने प्रथम सत्र परीक्षा, सराव परीक्षा, सराव चाचण्या वा तत्सम मूल्यमापनानुसार अवलंबून असेल. यासाठी संगणक प्रणाली विकसित केली असून, त्यानुसार आराखडा आणि गुणांचा ताळमेळ बसवला जाणार आहे. 

Web Title: Twelfth results This month, the schedule of the evaluation process is announced

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.