बारा कोटींच्या महाराष्ट्रात फक्त २० हजार बाटल्या रक्त शिल्लक

By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2021 08:23 AM2021-06-30T08:23:00+5:302021-06-30T08:23:31+5:30

‘लोकमत’चा रक्तदानासाठी पुढाकार; २ जुलैपासून राज्यभर मोहीम

Twelve crore bottles of blood left in Maharashtra of 12 crores | बारा कोटींच्या महाराष्ट्रात फक्त २० हजार बाटल्या रक्त शिल्लक

बारा कोटींच्या महाराष्ट्रात फक्त २० हजार बाटल्या रक्त शिल्लक

Next

अतुल कुलकर्णी 

मुंबई : २९ जून अर्थात आजचा दिवस महाराष्ट्रासाठी काही अडचणी घेऊन आला आहे. आजच्या तारखेला महाराष्ट्रात  ब्लड बँकांमधून फक्त २०,४५४ युनिट्स रक्त शिल्लक आहे. त्यातले ३,८७३ युनिट्स रक्त एकट्या  मुंबईमध्ये शिल्लक आहे. राज्याची रोजची गरज किमान ६ ते ८ हजार युनिट्ची असताना, इतक्या कमी रक्त उपलब्धतेचा परिणाम वेगवेगळ्या शस्त्रक्रिया आणि अपघातांतील सापडलेल्या रुग्णांवर होणार आहे. गडचिरोली (३०), उस्मानाबाद (५५), नंदुरबार (६५) आणि वाशिम (९६) या चार जिल्ह्यांत आज एवढेच युनिट्स रक्त शिल्लक आहे.  

राज्यात दरवर्षी १६ ते १८ लाख युनिट्स रक्त गोळा होते. मात्र जून महिना संपत आला तेव्हा हा आकडा कसाबसा ६ लाखांपर्यंत पोहोचला आहे. हीच परिस्थिती कायम राहिल्यास वर्षभरात फार तर १२ ते १३ लाख युनिट्स रक्त गोळा होईल. कोरोनामुळे महाराष्ट्रात रक्त संकलन अत्यंत कमी प्रमाणात होत आहे. आपण रक्तदान करतेवेळी जे रक्त देतो, त्याला शास्त्रीय भाषेत ‘संपूर्ण रक्त’ (होल ब्लड) म्हणतात. प्रक्रिया करून घटक बाजूला काढले जातात त्याला ‘पीआरबीसी’ म्हणतात. मात्र ‘होल ब्लड’ नसेल, तर त्यावर प्रक्रिया करून ‘पीआरबीसी’ मिळवणे अशक्य होते. महाराष्ट्र हे ‘होल ब्लड’चे दुर्मिळ बनले आहे. कोणत्या ग्रुपचे किती रक्त शिल्लक आहे, हे चार्टवरून आपल्या लक्षात येईल. 

२ जुलैपासून महाराष्ट्रात ‘लोकमत रक्ताचं नातं’ ही रक्तदान मोहीम सुरू होत आहे.  एकप्रकारे सरकारला अशा बिकट परिस्थितीत लाखो वाचकांच्या सहकार्याने ‘लोकमत’ने मदतीचा हात पुढे केला आहे. आपणही पुढे येऊन रक्तदान केल्यास राज्यातील रुग्णांना फार मोठी मदत होणार आहे. रक्तदान हेच खरे प्राणदान आहे. महाराष्ट्राची जनता सजग आहे. ती या मोहिमेत मोठ्या संख्येने सहभागी होईल, असा आपला ठाम विश्वास असल्याचे मत लोकमत समूहाच्या एडिटोरियल बोर्डचे चेअरमन विजय दर्डा यांनी व्यक्त केले आहे.

अपुरा रक्तसाठा
अपुऱ्या रक्तपुरवठ्याचा परिणाम रुग्णांवर होऊ नये, यासाठी लोकमत समूहाच्या एडिटोरियल बोर्डचे चेअरमन विजय दर्डा यांनी ही परिस्थिती पाहूनच रक्तदान मोहिमेचे आयोजन हाती घेतले आहे. सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी त्यांचे दोन्ही विभाग सक्रियपणे या मोहिमेत जोडले आहेत. 

‘होल ब्लड’चा राज्यातील साठा
ए पॉझिटिव्ह : ५४५
ए निगेटिव्ह : ९२
बी पॉझिटिव्ह : ७२९
बी निगेटिव्ह : ५०
एबी पॉझिटिव्ह : २१६
एबी निगेटिव्ह : १३
ओ पॉझिटिव्ह : ७३३
ओ निगेटिव्ह : ६०

‘पीआरबीसी’चा राज्यातील साठा
ए पॉझिटिव्ह : ४३९५
ए निगेटिव्ह : ३८३
बी पॉझिटिव्ह : ४५४२
बी निगेटिव्ह : ३८८
एबी पॉझिटिव्ह : १९१७
एबी निगेटिव्ह : १४२
ओ पॉझिटिव्ह : ५७९६
ओ निगेटिव्ह : ४५३

२०,४५४
राज्यात एकूण रक्तसाठा

२,३२३
रँडम डोनर प्लेटलेट्स

 

Web Title: Twelve crore bottles of blood left in Maharashtra of 12 crores

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.