Join us

बारा कोटी रुपयांची मद्यविक्री, काही जिल्ह्यात मद्यविक्री सुरु नाही 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 05, 2020 6:51 PM

सोमवारी राज्यात दिवसभरात बारा कोटी रुपयांची मद्यविक्री, काही जिल्ह्यात मद्यविक्री सुरु नाही, मद्यविक्रीच्या निर्णयामुऴे पोलिसांमध्ये नाराजी 

 

मुंबई : राज्यात मद्यविक्री सुरु झाल्याच्या पहिल्याच दिवशी सोमवारी सुमारे बारा कोटी रुपयांची मद्यविक्री झाली. मद्यपींनी मद्य दुकानांवर जणू झडपच घातली होती. राज्याच्या काही जिल्ह्यांमध्ये मद्यविक्री दुसऱ्या दिवशी सुध्दा सुरु झाली नाही. त्यामुळे तळीरामांचा हिरमोड झाला. 

सोमवारी दुपारी मुंबई शहर व उपनगर जिल्हाधिकारी  कार्यालयांनी मद्यविक्रीबाबतचे निर्देश दिले त्यानंतर अनेक ठिकाणी मद्यविक्री सुरु झाली. मंगळवारी मुंबईतील विविध भागात मद्य खरेदी करण्यासाठी सकाळपासून मद्यपींनी रांगा लावल्या होत्या. मद्यखरेदीसाठी मोठ्या संख्येने नागरिक रस्त्यावर रांगा लावून उभे राहिले होते. काही ठिकाणी रांगेतील क्रमांकावरुन आपापसात बाचाबाचीचे प्रकार घडत होते. कोणताही तणाव वाढू नये व कायदा सुव्यवस्था धोक्यात येवू नये यासाठी पोलिसांनी विविध वाईन शॉप परिसरात बंदोबस्त तैनात केला होता. वडाऴा येथील बरकतअली मार्गावरील वाईन शॉपसमोर सकाळपासूनच गर्दी होती. गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिस कार्यरत होते. दुकानदार मद्याचा काळाबाजार रोखण्यासाठी एका ग्राहकाला दोन किंना तीनच बाटल्या देत होते. त्यामुळे स्टॉक वाढवण्यासाठी ग्राहकांना पुन्हा पुन्हा रांगेत उभे राहावे लागत होते. 

तळीराम मोठ्या संख्येने वाईनशॉपसमोर उभे असल्याने पोलिसांच्या कामाचा ताण वाढला आहे. त्यांना बंदोबस्तासाठी आणखी काम लागले आहे. पोलिसांना तळीरामांसाठी रस्त्यावर, उन्हातान्हात उभे राहावे लागत असल्याने त्यांच्यामध्ये सरकारच्या या निर्णयाबाबत तीव्र नाराजीचे वातावरण आहे.  सोमवारी राज्यात सुमारे बारा कोटी रुपये किंमतीची तीन ते चार लाख लिटर दारुची विक्री झाली, साधारणत: राज्यात दिवसाला 24 लाख लिटर दारुची विक्री होते. मात्र राज्याच्या विविध भागात मद्यविक्री सुरु झालेली नसल्याने तीन ते चार लाख लिटर दारु विक्री झाल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त कांतीलाल उमाप यांनी दिली. 2019-20 या आर्थिक वर्षात राज्याला दारुतून 15 हजार 428 कोटी महसूल मिळाला होता. राज्यात वर्षभरात सुमारे 86.7 कोटी लिटर दारुचे सेवन केले जाते. त्यामध्ये 35 कोटी लिटर देशी दारु, 20 कोटी लिटर विदेशी दारु, 31 कोटी लिटर बिअर आणि 70 लाख लिटर वाईनचा समावेश आहे.

 

टॅग्स :कोरोना वायरस बातम्याअर्थव्यवस्थामहाराष्ट्रात कोरोना व्हायरस