मुंबई : कांदिवलीत बोगस लसीकरण शिबिरात इंजेक्शन घेऊन बाराशे साठ रुपये मोजणाऱ्या जैना सांघवी (३१) यांना ती लस अडीच लाखांना पडली आहे. त्यांना कोरोना झाल्यावर स्थिती गंभीर झाल्याने रुग्णालयाचे बिल लाखोंवर जाऊन पोहोचले आणि त्यांची प्रकृतीदेखील ढासळली होती.
सांघवी या कांदिवलीत हिरानंदानी हेरिटेज इमारतीत राहत होत्या. बोगस लसीकरण शिबिरांमध्ये त्यांनीही लस घेत त्यासाठी बाराशे साठ रुपये मोजले होते. मात्र, जवळपास दोन आठवड्यांत त्या अचानक आजारी पडल्या. त्यांना सर्दी आणि ताप आल्याने त्यांनी तातडीने आरटीपीसीआर चाचणी करवून घेतली. ज्यात त्यांना कोरोना झाल्याचे समजले. त्यांची प्रकृती अधिकच बिघडल्याने त्यांना कांदिवलीच्या ऑस्कर रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्या ठिकाणाहून त्यांना डिस्चार्ज मिळाला असून, रुग्णालयाचे बिल अडीच लाख झाल्याचे त्यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. त्यांना जर वेळेत योग्य लस मिळाली असती तर त्यांच्यावर हा प्रसंग ओढवला नसता, असेही त्यांचे म्हणणे असून, बनावट लसीकरण झालेल्यांसह सगळ्यांचेच लसीकरण लवकरात लवकर करण्यात यावे, अशी विनंती त्यांनी प्रशासनाला केली आहे.
दरम्यान, मुंबई व ठाण्यात करविण्यात आलेल्या तीन हजार लोकांच्या बनावट लसीकरणाचे मास्टर माइंड आणि बॅन करण्यात आलेल्या चारकोपमधील शिवम रुग्णालयाचे मालक डॉ. शिवराज पतरिया यांनाही कोरोनाची लागण झाली असून, त्यांना उपचारासाठी जी. टी. रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, तर त्यांची पत्नी आणि सहआरोपी नीता पतरिया, महेंद्र सिंग, डॉ. मनीष त्रिपाठी, राजेश पांडे, राहुल दुबे, श्रीकांत माने, सीमा आहुजा, अनुराग त्रिपाठी, संजय गुप्ता, चंदन सिंह, गुडीया यादव, करीम अली आणि नितीन मोडे या सगळ्यांची कोविड चाचणी निगेटिव्ह आली असून, ते सर्व पोलीस कोठडीत आहेत.