- सचिन लुंगसे
लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : एमटीएनएलचे १८ हजार कर्मचारी होते. ते आता फक्त १२०० उरले आहेत. मुंबईत १४ झोन होते ते आता फक्त पाच उरले. आता फक्त मोठे कुलूप आणून लावायचे बाकी आहे. जेणेकरून मुंबईतली एमटीएनएलची कोट्यवधीची मालमत्ता खासगी लोकांकडे जाईल, त्यामुळे १५ ते १६ लाख ग्राहक खासगी टेलिफोन कंपन्यांना आयते मिळतील. एमटीएनएल, महापालिका आणि मेट्रो या तिघांच्या भांडणात लाखो मुंबईकरांचे लँडलाईन फोन मात्र चुन्याचे डबे झाले आहेत.
व्हीआरएस आणि निवृत्तीमुळे केवळ १२०० कर्मचाऱ्यांवर एमटीएनएलचे दुकान सुरू आहे. कंत्राटी कर्मचाऱ्यांना कामाचे पुरेसे ज्ञान नाही. त्यांच्यावर लक्ष ठेवण्यासही कोणी नाही. मनुष्यबळच नसल्याने आलेल्या तक्रारींचा निपटाराही होत नाही. कधीकाळी सोन्याचा धूर निघावा अशी श्रीमंती आणि ऐश्वर्य असणाऱ्या एमटीएनएलचे हे असे पुरते बेहाल झाले आहेत. जे अधिकारी आहेत ते हताश आहेत. सगळेच खासगी व्यवस्थेच्या ताब्यात द्यायचे धोरण आहे की काय माहिती नाही. मात्र, आम्हाला नवीन स्टाफ घेऊ दिला जात नाही. यंत्रणेचे नूतनीकरण करू दिले जात नाही. लोकांच्या शिव्या-शाप खायला आम्हाला बसवले आहे, अशी उद्दिग्न प्रतिक्रिया अनेक अधिकाऱ्यांनी बोलून दाखवली आहे.
उपाय काय केले कॉपर वायर्सला पर्याय म्हणून फायबर केबलचा वापर केला जात आहे. कारण फायबर वायर स्वस्त आहे. फायबर वायर्स चोरीला जात नाहीत. खोदकामाच्या ठिकाणी कॉपरच्या वायर्स चोरीला जाऊ नयेत म्हणून गस्ती पथके आहेत. ज्या परिसरात झाडांसह पोलवरून लहान वायर्स टाकणे शक्य आहे; तेथे भूमिगत वायर्सऐवजी जमिनीवरून वायर्स टाकायला सुरुवात.
खड्ड्यात अडकल्या अडचणी काम करताना केबल तुटली तर त्याची माहिती महापालिका, मेट्रो एमटीएनला देत नाही. लँडलाईन बंद पडल्याची तक्रार आली तर तुटकी केबल शोधताना अडचणी येतात. पॉइंटमनकडे दिलेल्या तक्रारीच्या नंबरनुसार केबलची दुरुस्ती केली जाते. मात्र, खोदकामे ढीगभर असल्याने कोणती केबल नादुरुस्त आहे? हे शोधण्यातच वेळ जातो.
एमटीएनएलने केले हात वरलाखोंच्या संख्येने वापरल्या जाणाऱ्या मोबाइलच्या जमान्यात लँडलाईनची चलती आहे हे विशेष. पण मेट्रो आणि रस्ते कामांसाठी ठिकठिकाणी सुरू असलेल्या खोदकामांचा फटका एमटीएनएलच्या केबलला बसला आहे. खोदकामामुळे लँडलाईन सेवा बंद पडत चालली आहे. तुटणाऱ्या केबलची जबाबदारी महापालिका आणि मेट्रो घेत नाही.
४०० किमी रस्त्यांच्या काँक्रीटीकरणाच्या कामाला पालिका लागली. दुसरीकडे एमएमआरडीएकडून पूर्व उपनगरात तर मुंबई मेट्रो कॉर्पोरेशन लिमिटेडकडून दक्षिण मुंबईपासून पश्चिम उपनगरापर्यंत भूयारी मेट्रो ३ ची कामे सुरू आहेत. ही कामे सुरू असतानाच दक्षिण मध्य मुंबईत महालक्ष्मी, वरळी, दादर तर पश्चिम उपनगरात वांद्रे, अंधेरी आणि पूर्व उपनगरात कुर्ला, कांजुरमार्ग येथील शेकडो ग्राहकांनी टेलिफोन बंद पडल्याच्या तक्रारी केल्या पण खोदकामांमुळे केबल दुरुस्त करता येत नाही म्हणत एमटीएनएलने हात वर केले आहेत.