कोटींच्या कर्जाच्या आमिषाने घातला बारा लाखांचा गंडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 1, 2018 01:16 AM2018-11-01T01:16:52+5:302018-11-01T01:17:39+5:30
महिला व्यावसायिकाची फसवणूक; मिरजेतील फादरसह पिता-पुत्राला अटक
- गौरी टेंबकर - कलगुटकर
मुंबई: ‘दहा कोटी रुपयांचे कर्ज घ्या आणि ते परत करू नका,’ असे आमिष दाखवून एका महिला व्यावसायिकाची १२ लाखांची लुबाडणूक करण्याचा प्रकार मालाडमध्ये उघडकीस आला आहे. या प्रकरणी सांगलीतील एका मिशनरीतील फादरसह तिघांना गुन्हे अन्वेषण शाखेच्या कक्ष -११ च्या पथकाने मंगळवारी अटक केली. थॉमस वसंत नावगिरे (वय ५६), दिलीप पोळ (६०) व त्याचा मुलगा शैलेश पोळ (३३) अशी त्यांची नावे असून, अन्य साथीदारांचा शोध सुरू आहे. नावगिरे हा सांगली जिल्ह्यातील मिरजच्या कॅथोलिक चर्चमध्ये फादर आहे.
मालाडच्या दिंडोशी येथील ४० वर्षांच्या वीणा शहा (नावात बदल) यांचा अगरबत्तीचा व्यवसाय आहे. त्यांनी ३० आॅक्टोबरला या प्रकरणी दिंडोशी पोलिसांत तक्रार दाखल केली होती. शैलेश हा पुणे, सोलापूर, सातारा, सांगली आणि कोल्हापूरमध्ये शाह यांच्या अगरबत्ती मार्केटिंगचे काम पाहायचा. त्याच्या कामाचे पैसे देण्यास शाह यांना थोडा उशीर झाला. तेव्हा ‘तुम्हाला व्यवसायासाठी पैशांची गरज आहे का,’ अशी शैलेशने त्यांच्याकडे विचारणा केली.
त्यानंतर, अवघ्या दोन दिवसांत त्यांच्या बँक खात्यात त्याने १ लाख ३५ हजार जमा केले. कमी पगार असूनही इतकी मोठी रक्कम शैलेशने कशी उभी केली, याबाबत शाह यांनी विचारल्यानंतर, ‘मी दहा कोटी रुपये मिळवून देतो, मुख्य म्हणजे ते कर्ज तुम्हाला परत करावे लागणार नाही. मात्र, त्यासाठी काही लाख तुम्हाला खर्च करावे लागतील,’ असे शैलेशने सांगितले. त्याच्या आमिषाला फसून शहा यांनी शैलेशला १२ लाख दिले. त्यानंतर, तो नियोजित रक्कम देण्यास टाळाटाळ करू लागल्याने शहा यांनी पोलिसांकडे तक्रार दिली.
या प्रकरणी कक्ष-११चे प्रमुख चिमाजी आढाव यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक शरद झिने आणि त्यांच्या पथकाने या प्रकरणी मिरजेतून नावगिरे याला तर मालाड परिसरातून पोळ पिता-पुत्राला अटक केली.
नऊ लाखांची मागणी; मारहाणही केली
शैलेशने ४ आॅक्टोबरला शहा यांना फोन करून कर्जाची रक्कम घेण्यासाठी मिरजमध्ये बोलावले. त्यानुसार, १२ लाख रुपये घेऊन त्या सांगलीला गेल्या. त्या वेळी शैलेशच्या अन्य दोन साथीदारांसह राजू नावाचा एकजण हजर होता. तो कोणत्याही देशाचे हुबेहूब चलन छापण्यात पटाईत आहे. त्याच्याकडे मशिन असल्याचेही त्यांनी शहा यांना सांगितले, तसेच त्याच्याकडे असलेले झिम्बाब्वे आणि कॅलिफोर्नियाचे बनावट चलनही दाखविले. त्यानंतर, त्यांनी त्यांच्याकडे एक बॅग देत, त्यामध्ये १० कोटी रुपये असून, तुम्ही आता ती उघडू नका. येथे पोलिसांची धाड पडते, असे सांगत त्यांना घाबरवले. काही वेळाने अनोळखी इसम त्या ठिकाणी येत, स्वत:ला सीआयडी अधिकारी म्हणवू लागले. त्यांनी राजूला दोन थप्पड लगावल्या आणि शहा यांच्याकडील दोन्ही बॅगा घेऊन राजूसोबत ते निघून गेले. हा सगळा प्रकार पाहून घाबरलेल्या शहा मुंबईत परतल्या. मात्र, पुन्हा त्यांच्याकडे या टोळक्याने ९ लाख रुपयांची मागणी केली.