कोपरखैरणेत बारा महिने डासांचा कहर
By Admin | Published: November 7, 2014 01:10 AM2014-11-07T01:10:35+5:302014-11-07T01:10:35+5:30
कोपरखैरणे परिसरात डासांचा कहर झाला आहे. विशेषत: सायंकाळच्या वेळी या डासांचा उपद्रव वाढल्याने रहिवासी हैराण झाले आहेत
नवी मुंबई : कोपरखैरणे परिसरात डासांचा कहर झाला आहे. विशेषत: सायंकाळच्या वेळी या डासांचा उपद्रव वाढल्याने रहिवासी हैराण झाले आहेत. खाडी किनाऱ्यावरील मत्स्यशेती आणि शेजारच्या होल्डिंग पॉण्डमधील दुर्गंधी यामुळे या परिसरात डासांचा उपद्रव वाढला आहे. त्यामुळे साथीच्या रोगांनी तोंड वर काढले आहे. याप्रकाराकडे महापालिकेच्या संबंधित विभागाने पाठ फिरविल्याने या परिसरातील रहिवाशांनी संताप व्यक्त केला आहे.
साथींना अटकाव करण्यासाठी प्रशासनाकडून उपाययोजना सुरू आहेत. पण शहराच्या इतर भागात डास निर्मूलनाची जोरदार मोहीम सुरू असतानाच कोपरखैरणे परिसराकडे पाठ फिरविल्याचा आरोप नागरिकांतून होत आहे. कोपरखैरणे गावासह सेक्टर १९, २२, २३,१४ तसेच १७ आणि १८ या वसाहती खाडी किनाऱ्याच्या जवळ आहे. खाडी किनाऱ्यावर स्थानिकांचा पारंपरिक मत्स्यशेतीचा व्यवसाय आहे. खाडीत अनेकांनी मत्स्यशेतीसाठी छोटी छोटी पाण्याची डबकी करून ठेवली आहेत. डासांच्या उत्पत्तीला हे डबके पोषक ठरल्याने परिसरात डासांचा उपद्रव वाढला आहे. आयुक्त आबासाहेब जऱ्हाड यांनी बुधवारी शहराच्या विविध भागाचा दौरा करून डास उत्पत्ती स्थळांची पाहणी केली. यावेळी या ठिकाणी औषध फवारणीचे आवाहन संबंधित मच्छीमारांना केले. मात्र औषध फवारणीला ग्रामस्थांचा विरोध कायम असल्याने प्रशासानाचे अधिकारीही हतबल झाल्याचे दिसले.