बारा नगरसेवक मनसेवर नाराज
By admin | Published: April 19, 2016 02:50 AM2016-04-19T02:50:41+5:302016-04-19T02:50:41+5:30
गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवाजी पार्कात घेतलेल्या मेळाव्यानंतर पक्षाला चैतन्य येण्याऐवजी मरगळ आल्याचे चित्र आहे.
सचिन लुंगसे, मुंबई
गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवाजी पार्कात घेतलेल्या मेळाव्यानंतर पक्षाला चैतन्य येण्याऐवजी मरगळ आल्याचे चित्र आहे. पक्षादेश धुडकावल्याप्रकरणी मनसेने मागील आठवड्यातच गीता श्रीकृष्ण चव्हाण आणि सुखदा राहुल पवार या दोन महिला नगरसेविकांना निलंबित केले असतानाच आता राजकीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सुमारे बारा नगरसेवक मनसेला ‘जय महाराष्ट्र’ करण्याच्या तयारीत आहेत.
मागील आठवड्यात मुंबई महापालिकेच्या प्रभाग समिती अध्यक्षपदाच्या निवडणुका पार पडल्या होत्या. या निवडणुकीवेळी खिरानगरमधील गीता चव्हाण आणि विवेकानंदनगरमधील सुखदा पवार या मनसेच्या दोन महिला नगरसेवकांनी शिवसेनेला मतदान केले होते. परिणामी पक्षाने संबंधितांवर निलंबनाची कारवाई केली. शिवाय त्यांचे नगरसेवकपद रद्द करण्यात यावे, यासाठी कोकण विभागीय आयुक्तांना निवेदनही दिले होते. दरम्यान, या घटनेला ७२ तास उलटत नाहीत, तोवर मनसेमधील सुमारे बारा नगरसेवक शिवसेना अथवा भाजपाच्या वाटेवर असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
मुंबई महापालिकेच्या निवडणुकीचे पडघम वाजण्यास सुरुवात झाली आहे. यासाठी विविध राजकीय पक्षांतील इच्छुक उमेदवारांनी वर्चस्व पणाला लावले आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये छुप्या कारवाया सुरू असतानाच शिवसेना आणि मनसेमधील असंतोष मात्र आता खदखदू लागला आहे. विशेषत: शिवसेनेमधून मनसेमध्ये दाखल झालेले काही चेहरे पुन्हा शिवसेनेत दाखल होण्याच्या मार्गावर आहेत. राजकीय हेवेदावे, छुप्या कारवाया हे सर्व यामागे असल्याने भाजपा आणि शिवसेनेच्या वाटेवर असलेले इच्छुक याबाबत थेट बोलण्याचे टाळत आहेत.
राजकीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मनसेचे प्रकाश दरेकर, ईश्वर तायडे, संजय भालेराव हे भाजपाच्या वाटेवर असल्याची माहिती आहे, तर दिलीप लांडे हे शिवसेनेच्या मार्गावर असल्याचे सूत्रांनी सांगितले. महत्त्वाचे म्हणजे मनसेत दाखल झालेल्या डॉ. शुभा राऊळ यादेखील शिवसेनेत आल्या आहेत. सध्या मनसेचे अनेक स्थानिक नेते शिवसेनेच्या वाटेवर असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.
> प्रतीक्षा नक्की कशाची?
राजकीय चर्चेनुसार, शिवसेना आणि भाजपाच्या वाटेवर असलेले नगरसेवक वॉर्डच्या पुनर्रचनेसह आरक्षणाच्या प्रतीक्षेत आहेत. परिणामी सध्या तरी संबंधितांनी मनसे सोडण्याचे निश्चित केलेले असले तरी तसा निर्णय अद्याप घेतलेला नाही. जेव्हा पुनर्रचना आणि आरक्षण घोषित होईल, तेव्हा मात्र मनसेच्या काही नगरसेवकांच्या भाजपा आणि शिवसेनेत उड्या पडतील.
> नाराजी, नाराजी आणि नाराजी...
पक्षादेश पाळले नसल्याचे म्हणत मनसेने दोन महिला नगरसेविकांना निलंबित केले असले तरी अनेक नगरसेवकांच्या मनात होत असलेल्या अन्यायाबाबत खदखद आहे. संबंधित नगरसेवक बोलण्याचे टाळत असले तरी पक्षातील काही मातब्बर नेत्यांचे फोटो ‘भाजपा’च्या बॅनरवर लागत असतानाच पक्षाच्या समित्यांवर मात्र ‘या’ नेत्यांची वर्णी आहे. परिणामी संबंधित नेते दोन्हीकडे कसे, असे छुपे सवाल केले जात आहेत. पक्षाकडून होणाऱ्या कारवाईच्या भीतीने यावर चर्चा करणे मात्र संबंधित सध्या टाळत आहेत.
> १मुंबई महापालिकेच्या निवडणुकांसाठी प्रत्येक राजकीय पक्षातील इच्छुक उमेदवारांनी कंबर कसली असतानाच येत्या काही महिन्यांतच नगरसेवकांच्या वॉर्डचे डिलिमिटेशन आणि आरक्षण होणार आहे. महापालिका प्रशासनातील सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, वॉर्डचे डिलिमिटेशन आणि आरक्षण जून महिन्यात होईल.
२डिलिमिटेशन म्हणजे वॉर्डची हद्द, सीमा निश्चित होईल. परिणामी अनेक नगरसेवकांच्या मतदारसंघांची पुनर्रचना होईल. शिवाय अनेक वॉर्ड महिलांसाठी आणि एससी, एसटी आणि ओबीसींसाठी आरक्षित होतील. म्हणजेच अनेक नगरसेवकांचे वॉर्ड पुनर्रचित होणार असून, आरक्षणही बदलले जाणार आहे.
ही तर भाजपा-सेनेची खेळी
मनसे सोडून नगरसेवक अन्य पक्षांत जात असलेली चर्चा ही भाजपा आणि शिवसेनेने पेरलेली चर्चा असल्याचे मनसेतील एका वरिष्ठ नेत्याने ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. आम्ही सध्या मनसेसोबत आहोत. मनसे सोडण्याचा तूर्तास तरी विचार नसल्याचेही या नेत्याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले.