बारावीत शिकणाऱ्या ‘त्या’ मुलास गेटवर १५ जणांनी केली मारहाण; कांदिवलीतील प्रकार

By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2022 07:09 AM2022-03-17T07:09:57+5:302022-03-17T10:26:38+5:30

तक्रारदारालाच आरोपीचा पत्ता देण्याचा ‘सल्ला’

Twelve students were beaten up by 15 people at the gate | बारावीत शिकणाऱ्या ‘त्या’ मुलास गेटवर १५ जणांनी केली मारहाण; कांदिवलीतील प्रकार

बारावीत शिकणाऱ्या ‘त्या’ मुलास गेटवर १५ जणांनी केली मारहाण; कांदिवलीतील प्रकार

Next

- गौरी टेंबकर-कलगुटकर

मुंबई : कांदिवलीतील एका नामांकित कॉलेजमध्ये बारावीत शिकणाऱ्या युवराज चौरसिया (१७) या विद्यार्थ्याला गेटसमोर १५ जणांनी मारहाण केली. यातील बहुतेक जण हे याच कॉलेजमध्ये पदवी अभ्यासक्रमाचे विद्यार्थी असल्याचा दावा जखमी विद्यार्थ्याने केला आहे. मात्र याविरोधात कॉलेजने कोणतेही कायदेशीर पाऊल उचललेले नाही. कांदिवली पोलिसांनी तक्रारदारालाच आरोपींचा पत्ता शोधून आणण्यास सांगत याप्रकरणी अदखलपात्र गुन्हा (एनसी) नोंदवला.

तक्रारदार विद्यार्थी हा वाणिज्य शाखेत शिकतो. त्याने दिलेल्या माहितीनुसार, १० मार्च रोजी कॉलेजमध्ये हल्लेखोर घोळका करून उभे असल्याने त्यांना साईड द्या, अशी विनंती विद्यार्थ्याने केली. त्यावर त्यातील एकाने विद्यार्थ्याला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. यातून तक्रारदार आणि हल्लेखोर गटात भांडण झाले.

कॉलेज सुटल्यावर सायंकाळी ६.३० च्या सुमारास तक्रारदार घरी जाण्यासाठी निघाला. त्यावेळी हल्लेखोर गट त्याची वाट पाहत कॉलेज गेटकडे उभा होता. तो जसा बाहेर आला तसा त्यांनी त्याला पकडले व मारहाण केली. यात त्याच्या डोळ्याला व हातापायाला दुखापत झाली. हा सगळा प्रकार कॉलेज प्रशासन आणि शिक्षकांसमोर घडला. तेव्हा तक्रारदाराच्या वर्गशिक्षिकेने आणि अन्य एका शिक्षिकेने हे भांडण सोडविले. हा प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला असून, त्याची ‘क्लिप’ ‘लोकमत’कडे आहे. त्यानंतर विद्यार्थी घरी गेला आणि पालकांना त्यांनी हा प्रकार सांगितला. त्याला रुग्णालयात उपचारासाठी नेल्यावर त्याच्या डोळ्याला, चेहऱ्याला जखमा आणि अन्य ठिकाणी मुकामार लागला आहे. 

मी चौकशी करतो
या मारहाणप्रकरणी मला काहीच कल्पना नसून मी चौकशी करतो. अन्यथा तक्रारदाराला मला भेटायला सांगा.
- दिनकर जाधव, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, कांदिवली पोलीस ठाणे

 सीसीटीव्हीसाठीही पालकांचे हेलपाटे

चौरसिया याच्या पालकांनी घटनेच्या सीसीटीव्ही फुटेजसाठी कॉलेज प्रशासनाला विनंती केली. तेव्हा त्यांनी पोलीस आले तरच आम्ही सहकार्य करू, असे सांगितले. मात्र निव्वळ एनसी दाखल करून बाजूला झालेल्या पोलिसांनी काहीच पाऊल उचलले नसल्याने विद्यार्थ्यांचे पालक कॉलेजमध्ये आठवडाभर फेऱ्या मारत होते. अखेर त्याची आई ४ तास मुख्याध्यापक कक्षाकडे बसून राहिल्यावर त्यांना सीसीटीव्ही फुटेज दिल्याचे तक्रारदाराने सांगितले.

Web Title: Twelve students were beaten up by 15 people at the gate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.