Join us

वर्षभरात चार नव्या रो-रो सेवांसह बारा वाॅटरटॅक्सी मार्ग कार्यान्वित करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 08, 2021 4:07 AM

मुंबई : रस्त्यावरील वाहतूक कोंडी आणि प्रदूषणाच्या समस्येवर मात करण्यासाठी मुंबई महानगर क्षेत्रातील प्रवासी जलवाहतुकीला प्राधान्य देण्यात येणार आहे. ...

मुंबई : रस्त्यावरील वाहतूक कोंडी आणि प्रदूषणाच्या समस्येवर मात करण्यासाठी मुंबई महानगर क्षेत्रातील प्रवासी जलवाहतुकीला प्राधान्य देण्यात येणार आहे. या वर्षाखेरपर्यंत चार मार्गांवर रो-रो सेवा तर एकूण बारा मार्गांवर वाॅटरटॅक्सीची सुविधा कार्यान्वित करण्यात येणार असल्याची माहिती केंद्रातील जलवाहतूक आणि बंदरे राज्यमंत्री मनसुख मांडविय यांनी दिली.

मांडविय यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईसह महाराष्ट्रातील जलवाहतुकीसंदर्भात बैठक झाली. यावेळी संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी, मुंबई पोर्ट ट्रस्टचे संचालक, महाराष्ट्र मेरीटाइम बोर्डाचे सदस्य उपस्थित होते. सध्या भाऊचा धक्का ते मांडवादरम्यान रो-रो सेवा व्यवस्थित सुरू असल्याने ११० किलोमीटरचा रस्ते प्रवास जलमार्गाने १८ किलोमीटर इतका कमी झाला आहे. ३ ते ४ तासांचा प्रवासाचा कालावधीसुद्धा चार तासांवरून एका तासावर आला आहे. याच धर्तीवर भाऊचा धक्क्यापासून नेरूळ, काशीद, मोरा तसेच कारंजा ते रेवसदरम्यान रो-रो सेवा सुरू केली जाणार आहे. याशिवाय नव्या बारा मार्गांवर प्रवासी जलवाहतुकीसाठी वाॅटरटॅक्सींची सुविधा निर्माण केली जाणार असल्याचे मांडविय यांनी स्पष्ट केले. या सर्व सुविधा डिसेंबर २०२१पर्यंत कार्यान्वित करण्याचा सरकारचा मानस आहे.

नव्या रो-रो आणि हाॅटेल टॅक्सीमुळे मुंबई महानगर क्षेत्रातील प्रवासाचा वेळ वाचणार आहे. प्रवास खर्चातही बचत होणार असून, प्रदूषण कमी करण्यासही मदत होणार आहे. मुंबईतील वाढते पर्यटक आणि प्रवासी यांच्या प्रवासाच्या गरजा पुऱ्या करण्याच्या दृष्टीनेसुद्धा जलवाहतूक महत्त्वाची ठरणार आहे. विविध सागरी राज्यात रो-रो आणि वॉटरटॅक्सी सेवांचे नवीन जाळे उभारण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

रो-रो सेवेचे मार्ग (कंसात जलमार्गाची लांबी आणि लागणारा वेळ)

भाऊचा धक्का ते नेरूळ-सिडको (२४ किमी, एक तास)

भाऊचा धक्का ते काशीद (६० किमी, दोन तास)

भाऊचा धक्का ते मोरा (१० किमी, ३० मिनिटे)

कारंजा ते रेवस (३ किमी, १५ मिनिटे)

वाॅटरटॅक्सी मार्ग (कंसात जलमार्गाची लांबी आणि लागणारा वेळ)

क्रुझ टर्मिनल ते नेरूळ (१९ किमी, ४० मिनिटे)

क्रुझ टर्मिनल ते बेलापूर (२० किमी, ४५ मिनिटे)

क्रुझ टर्मिनल ते वाशी (२२ किमी, ४० मिनिटे)

क्रुझ टर्मिनल ते ऐरोली (३४ किमी, सव्वा तास)

क्रुझ टर्मिनल ते रेवस (१८ किमी, सव्वा तास)

क्रुझ टर्मिनल ते कारंजा (१८ किमी, सव्वा तास)

क्रुझ टर्मिनल ते धर्मतर (४० किमी, दीड तास)

क्रुझ टर्मिनल ते कान्होजी आंग्रे बेट (१९ किमी, ४० मिनिटे)

बेलापूर ते ठाणे (२५ किमी, २० मिनिटे)

बेलापूर ते गेट वे ऑफ इंडिया (२३ किमी, २० मिनिटे)

वाशी ते ठाणे (१२ किमी, १५ मिनिटे)

वाशी ते गेट वे ऑफ इंडिया (२५ किमी, २० मिनिटे)