अष्टमीमुळे मुंबई तुंबली! मुंबई महापालिका आयुक्तांचे अजब स्पष्टीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2017 03:27 AM2017-09-07T03:27:31+5:302017-09-07T04:28:13+5:30

मुंबई तुंबल्यावर आतापर्यंत पावसाच्या नावाने खडे फोडणा-या पालिका प्रशासनाने, या वेळेस जावईशोध लावला आहे.

 Twenty-eight in Mumbai's tumble! A unique explanation of the Municipal Commissioner | अष्टमीमुळे मुंबई तुंबली! मुंबई महापालिका आयुक्तांचे अजब स्पष्टीकरण

अष्टमीमुळे मुंबई तुंबली! मुंबई महापालिका आयुक्तांचे अजब स्पष्टीकरण

Next

मुंबई : मुंबई तुंबल्यावर आतापर्यंत पावसाच्या नावाने खडे फोडणा-या पालिका प्रशासनाने, या वेळेस जावईशोध लावला आहे. गेल्या मंगळवारी अष्टमी असल्याने, या काळात भरतीची वेळ संपल्यानंतरही समुद्रात २.६ मीटर्स उंच लाटा उसळत होत्या, त्यामुळे मुंबई तुंबली, असे अजब स्पष्टीकरण आयुक्त अजय मेहता यांनी स्थायी समितीच्या बैठकीत आज दिले. हे कारण न पटल्याने, विरोधी पक्षांनी सभात्याग केला. मात्र, पावसाच्या पाण्याने मुंबई तुंबल्यानंतर, सत्ताधारी शिवसेनेवर टीकास्त्र सोडणारे पहारेकरी आज चिडीचूप होते.
२९ आॅगस्ट रोजी मुंबईत झालेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले. अनेकांच्या घरात पाणी शिरून त्यांचे संसार उघड्यावर आले, तर काहींना नाहक आपला जीव गमवावा लागला. याचे तीव्र पडसाद स्थायी समितीच्या बैठकीत आज उमटले. मुंबईची तुंबापुरी होण्यास प्रशासन व सत्ताधारी जबाबदार असल्याचा आरोप विरोधकांनी केला. कोट्यवधी रुपये खर्च करून पंपिंग स्टेशन उभारण्यात आली, तरीही पाण्याचा वेळेत निचरा करता आला नाही. पालिका प्रशासनाची यंत्रणा फेल ठरल्याचा निषेध म्हणून, सभा तहकूब करण्याचा ठराव विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी मांडला. मात्र, यावर निवेदन करताना आयुक्त अजय मेहता यांनी ५० मिमी. हून मोठा पाऊस पडल्यास पाणी तुंबणारच, असे ठामपणे सांगत, पालिकेची जबाबदारी झटकली. याउलट पावसाने पाणी नियंत्रणात आणण्यात पालिकेची यंत्रणा सक्षम ठरली. पंपिंग स्टेशनमुळे पाण्याचा निचरा होण्यास मदत झाली. पालिकेचे २८ हजार कामगार पाण्यात राहून काम करीत होते. संबंधित अधिकाºयांनीही परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी कामगिरी केली, असे कौतुक करत, त्यांनी पालिका कर्मचारी व अधिकाºयांची पाठ थोपटली.
विरोधकांचा हल्लाबोल
२६ जुलै २००५ मध्ये झालेल्या अतिवृष्टीनंतर सुचविण्यात आलेल्या उपाययोजनांची अंमलबजावणी अद्याप झालेली नाही. त्यानंतर, काहीही उपाययोजना करण्यात आली नसल्याचा आरोप काँग्रेसचे आसिफ झकारिया यांनी केला.
विरोधकांचा सभात्याग
विरोधकांच्या आरोपांचे खंडन करीत, आयुक्तांनी, पालिका अधिकाºयांनी काय काम केले, याचा खुलासा करीत, प्रशासनाची बाजू लावून धरली. दरम्यान, विरोधकांची सभात्यागाची मागणी बहुमताने नामंजूर करण्यात आली. त्यामुळे संतप्त झालेल्या काँग्रेस, राष्ट्रवादी, समाजवादी व मनसेने निषेध करीत सभात्याग केला.
शुक्रवारी विशेष बैठक
अशी परिस्थिती मुंबईत पुन्हा उद्भवू नये, यासाठी पालिका आयुक्त अजय मेहता यांनी शुक्रवारी विशेष बैठक बोलावली आहे. या बैठकीत अतिरिक्त आयुक्त, उपायुक्त, सहायक आयुक्त उपस्थित असणार आहेत. या बैठकीत भविष्यात अशी परिस्थिती टाळण्याचा कृती आराखडा तयार करण्यात येणार असल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले.
भाजपा चिडीचूप
पावसाने मुंबईची दाणादाण उडविल्यानंतर, भाजपाने शिवसेनेवर निशाणा साधला होता. या निसर्गाच्या मर्यादा की सत्ताधाºयांच्या मर्यादा? करदात्याला हे पटेल का? प्रख्यात डॉ. अमरापूरकर कुठे गायब झाले, त्याचे उत्तर देणार का? नालेसफाई झाली, असा ढेकर दिला. फोटो काढले, पण आता ज्यांच्या घरात पाणी शिरून संसार उध्द्वस्त झाले, त्यांचे काय करणार? असा जाबच भाजपा मुंबई अध्यक्ष आशीष शेलार यांनी शिवसेनेला विचारला होता. मात्र, पालिकेच्या स्थायी समितीमध्ये विरोधक आक्रमक असताना, भाजपा गप्प बसून राहिली, याबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे.
कुर्ला विभागात थोड्या पावसातही पाणी तुंबते. २९ आॅगस्टच्या पावसात झोपड्या पाण्याखाली गेल्या, त्याचा अनेक रहिवाशांना फटका बसला. येथे १५ नाले आहेत, यांची सफाई वरवरची झाली आहे. अधिकारी आयुक्तांच्या आदेशाची अंमलबजावणी करीत नाहीत, असे मनसेचे गटनेते दिलीप लांडे यांनी निदर्शनास आणले.
२००५नंतर काहीही सुधारणा झालेली नाही. पालिकेच्या इतर यंत्रणेसह आपत्कालीन नियंत्रण कक्षही फेल ठरले आहे, असा आरोप विरोधकांनी केला.
कोट्यवधी रुपये खर्च करून पंपिंग स्टेशन उभारण्यात आली होती. मात्र, यातील काही बंद ठेऊन ती उशिरा सुरू करण्यात आली. वेधशाळेने पावसाचा अंदाज दोन दिवसांपूर्वी वर्तविला होता. असे असताना उपाययोजना का केली नाही? असा सवालही विरोधकांनी केला.
पालिकेचे आपत्कालीन नियंत्रण कक्षही या वेळी निष्प्रभ ठरले. अत्यावश्यक सेवेसाठी असलेला नंबर लागत नव्हता. पालिकेचा इतर यंत्रणेशी समन्वय नसल्याने, लोकांपर्यंत मदत पोहोचत नव्हती. पालिकेचे कर्मचारी हवे तेथे मदतीसाठी दिसले नाहीत.
तासाभरातच पाणी साचले. पंपिंग स्टेशन उभारली आहेत, त्याचा परिणाम काहीही दिसून आला नाही. पाण्याचा निचरा होताना दिसत नव्हता. पावसापूर्वी आयुक्त म्हणाले, यंदा पाणी साचणार नाही. आता ५० मिमी पाऊस पडल्याने पाणी तुंबतेच, असे म्हणत जबाबदारी झटकत आहेत.

Web Title:  Twenty-eight in Mumbai's tumble! A unique explanation of the Municipal Commissioner

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.