सव्वाशे कोटींची उलाढाल
By Admin | Published: April 12, 2015 12:07 AM2015-04-12T00:07:04+5:302015-04-12T00:07:04+5:30
नवी मुंबई महापालिका निवडणुकीच्या अंतिम रिंगणात ५६८ उमेदवार असून, त्यात अधिकृत राजकीय पक्षांचे ३८५ उमेदवार आहेत.
नवी मुंबई : नवी मुंबई महापालिका निवडणुकीच्या अंतिम रिंगणात ५६८ उमेदवार असून, त्यात अधिकृत राजकीय पक्षांचे ३८५ उमेदवार आहेत. यात २० मातब्बर बंडखोर गृहीत धरल्यास खरी चुरस ४०० उमेदवारांत बघायला मिळणार असून एक उमेदवार सरासरी २० ते २५ लाख रुपये खर्च करणार असल्याचा अंदाज आहे. काही प्रभागात हा आकडा ४० ते ५० लाखांच्या घरात जाणार असल्याचा अंदाज आहे. यामुळे सरासरी २५ लाख रुपये जर प्रति उमेदवारामागे पकडले तर येत्या दहा - बारा दिवसांत १०० ते १२५ कोटींच्या उलाढालीचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
निवडणूक आयोगाने क वर्ग महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारांना ४ लाख रुपये खर्च मर्यादा घातली आहे. परंतु तीव्र स्पर्धा आणि महागाई पाहता अधिकृत पक्षांच्या उमेदवारांकडून सरासरी २० ते २५ लाख रुपये खर्च होण्याचा अंदाज आहे. यात बॅनर्स, प्रचार पत्रके, झेंडे, कार्य अहवाल, वाहनांचा खर्च, जेवणावळींसह मतदारांना आकर्षित करण्यासाठी देण्यात येणाऱ्या भेटी, मोठ्या नेत्यांच्या प्रचार यात्रा व
जाहीर सभा यांचा प्रामुख्याने
समावेश आहे. महापालिका निवडणुकीत शंभरवर उमेदवारांची मालमत्ता कोट्यवधींची असून काहींची मालमत्ता ५० ते १०० कोटींच्या घरात आहे. महापालिका निवडणुकीत सत्ताधारी राष्ट्रवादीसह काँगे्रस, शिवसेना-भाजपा या पक्षांत मुख्य चुरस आहे.
याशिवाय शिवसेना - भाजपात मोठ्या प्रमाणात बंडखोरी झाली आहे. बंडखोर उमेदवारही तगडे असल्याने निवडणूक चुरशीची होणार आहे. ही पार्श्वभूमी पाहता अधिकृत पक्षांच्या ३८५ उमेदवारासंह २० मातब्बर बंडखोर आणि रिंगणातील अन्य पावणेदोनशे उमेदवारांकडून होणारा दोन-तीन लाखांचा खर्च पाहता या निवडणुकीत १०० ते १२५ कोटींच्या उलाढालीचा अंदाज आहे. (खास प्रतिनिधी)
च्मतदारांना आकर्षीत करण्यासाठी सर्वच उमेदवारांनी सर्वतोपरी प्रयत्न करण्याचे ठरवले आहे. मतदानाच्या आधी मतदार राजाला कोणाकडून जेवण मिळणार आहे. तर कोणाकडून तीर्थयात्रा घडवली जाणार असल्याने मतदारांची चंगळ होणार आहे.
च्काही उमेदवारांनी तर अधिकृत तिकीट मिळण्याआधीच जेवणावळी, सहली, भेटी, यात्रांसह रुग्णवाहिनी, रस्त्यांची कामे करून मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला आहे. पालिका प्रशासनाने या निवडणुकीसाठी प्रशासकीय खर्च म्हणून ५.३२ कोटींची तरतूद केलेली आहे, हे विशेष.